Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

कुलस्वामी खंडोबा

भगवान श्रीशंकराने खंडोबा अवतार घेऊन भूतलावरील मणी मल्ल दैत्यांचे संकट दूर केले आणि भूलोक भयमुक्त केले. कुलस्वामी खंडोबाविषयी जाणून घेण्याची प्रत्येक मराठी जनांची उत्सुकता असते. पौराणिक किंवा ऐतिहासिक काळातील उपलब्ध साहित्यावरून (मार्तंडविजय ग्रंथ , मल्हारी महात्म्य आदी...) श्रीमार्तंडभैरव कथासार, पूजा प्रतीके, श्रीमल्हार स्थाने यांच्याविषयी थोडक्यात घेतलेला आढावा.......

ll येळकोट येळकोट जयमल्हार ll


संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणी गाढवांचा बाजार भरला जातो त्यापैकी एक मढी (जिल्हा अहमदनगर)व दुसरे जेजुरी येथे पौष पौर्णिमेला.यावेळी फार मोठी उलाढाल होते. पौर्णिमेच्या दुस-या व तिस-या दिवशी येथे विविध भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायती भरतात.

ज्याला न घडे काशी, त्याने यावे जेजुरीशी अशी एक ओळ एका लोकगीतामध्ये आहे ती पंचलिंग मंदिरा संदर्भातील आहे, काशी इतकेच महत्व या स्थानाला आहे. या मंदिरातील स्वयंभू लिंगावर अभिषेक पूजा केल्याने तीर्थाटनाचे पुण्य लाभते...

खैरे पाटील चालू लागले डोंगरावरून खाच खळग्यातून उतरत डोंगराच्या सोंडेवर दम घेण्यासाठी थांबले असता देव खरेच आपल्या पाठीशी आहेत का अशी शंका मनात आली व पाठीमागे वळून पहिले असता त्या ठिकाणी दोन स्वयंभू लिंगे दिसली...


शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी फत्तेखानाच्या छावणीवर छापा टाकला आणि आदिलशाही फौजेला पळता भुई थोडी केली. ही लढाई म्हणजे गनिमी काव्याचा पहिला वहिला अध्याय, आणि महाराजांची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथमच न्हाली ती येथे, इतका मोठा इतिहास या भूमीला आहे.


पानसेंनी आपल्या उत्कर्षाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती केली परंतु ते आपल्या घराण्याच्या कुलस्वामी खंडेरायाला मात्र विसरले नाहीत किल्ल्याला त्यांनी मल्हारगड असे नाव देवून आपल्या कुलस्वामी प्रती श्रद्धा व्यक्त केलेली आढळून येते.


Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

मार्तंड भैरव अवतार कथा

कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परीसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्र देवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

इंद्र देवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी  कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले.मणी-मल्ल दैत्यांचा संहार करण्यासठी सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर अवतरले.

या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने  तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले.

दैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले, "प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे". मणीसूराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.

त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले  व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद 

टांक

टांक

सर्वसाधारणतः टांक हे चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे असतात,परंतु क्वचित प्रसंगी जुने पाषाणातील टाक सुद्धा आढळतात. देवघरात पूजेमध्ये असणा-या टांकांची  संख्या विषम असते. तांब्यावर चांदीचा पातळ तुकडा ठेवून बनविलेले टांक विशेष प्रचलित आहेत. चांदीच्या तुकड्यावर साच्याच्या सहाय्याने देवतेच्या मूर्तीचा ठसा उमटविला जातो आणि मग हा चांदीचा तुकडा तांब्याच्या तुकड्यावर बसविला जातो आणि सर्व बाजूने तो तांब्याच्या तुकड्यात सांधला जातो. त्यामुळे त्याला भक्कमपणा येतो.
टांकांवरील बारीकसारिक तपशील हे तर या कलेचा उत्कृष्ट आविष्कार आहेत. देवाचा आपल्यावरील अनुग्रह व्हावा, या भावनेतूनही भाविक टांक तयार करवून आपल्या देव्हार्‍यात ठेवतात. जेजुरीच्या खंडोबाचे टांक दोन-तीन प्रकारचे मिळतात. खंडोबा हा घोड्यावर असून त्याच्या मागे त्याची पत्नी म्हाळसा बसली आहे आणि खंडोबाच्या हातात शस्त्रे असून घोड्याच्या खालच्या बाजूला एक श्वान आहे. खंडोबा या दैवताची पारंपरिक कथा या टांकात चित्रित झाली आहे.
घरामध्ये शुभकार्य उदा. लग्न,मौजीबंधन ई. प्रसंगी नविन टांक बनविले जातात, अथवा उजळले जातात. टांक बनवून घेताना माहितगार कारागिरांकडून बनवून घेणे उत्तम. ब-याचदा अमराठी अथवा अकुशल कारागीर टांक बनवून देतात परंतु आपल्याकडील उपलब्ध असणारे टांक भाविकांच्या माथी मारतात. अशा वेळी जेजुरी, तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी टांक बनवून घेऊन विधिवत पूजा करून घेणे सोयीस्कर पडते.


मूर्ती

मूर्ती :श्रीमल्हारी म्हाळसाकांत हे वीर योद्ध्यांचे दैवत असल्याने सदैव युद्धासाठी सज्ज असलेल्या स्वरूपामध्ये दिसते. त्याबरोबरच सोबत पत्नी म्हाळसा देवी असल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि सुबत्ता देणारे दैवत म्हणूनही बहुजन याला देवघरामध्ये पूजतात. मल्हारभक्तांच्या देवघरामध्ये पितळ, चांदी किंवा पंचधातू पैकी एका धातूमध्ये घडविलेली, उभ्या किंवा अश्वारूढ स्वरूपामध्ये श्रीखंडेरायाची मूर्ती आढळते. उभ्या असलेल्या मूर्तीमध्ये वामांगी म्हाळसा सहित श्रीखंडोबा असतात, तर पाठीमागे प्रभावळ असते.  अश्वारूढश्रीखंडोबाच्या मूर्ती द्विभुज किंवा चतुर्भुज असतात, द्विभुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग आणि पानपात्र आढळते तर चतुर्भुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग,त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र असते. बहुतांश वेळा घोड्यावर बसलेल्या श्रीखंडेराया सोबत म्हाळसादेवीही असते आणि घोड्याच्या पायाजवळ श्वान आढळतो. अलीकडे घडविलेल्या मूर्तींमध्ये श्रीखंडोबाच्या शिरावर शिंदेशाही पगडी असते, जुन्या मूर्तींचे शिरस्त्राण हे टोपासारखे असते.


अश्व

मणि युद्धास प्रवर्तला, जाऊनि अश्वावर बैसला

ते पाहुनी शंकर भोळा, चंद्रालागी आज्ञा करी
म्हणे तु अश्व होई सत्वर, आज्ञा वंदुनी निशाकर
अश्व झाला साळंकार परम चपळ असे तो
त्या अश्वावर करी आरोहण
दैत्य मस्तक टाकीला छेदु
त्या दिवसापासून अश्व वाहन प्रिय असे देवासी

मणि मल्लासूर युद्धामध्ये मार्तंड भैरवाने नंदी ऐवजी अश्व वाहन स्वीकारले पण तो अश्व चपळ असावा म्हणून चंद्राला अश्वरूप घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे चंद्राने अश्वरूप धारण केले. या अश्वाने खंडोबा परीवारमध्ये महत्वाचे स्थान मिळवले आहे त्यामुळे मल्हारभक्तांच्या देवघरा मध्येही याला स्थान मिळाले आहे. आजही जेजुरगड मंदिरामध्ये मध्य गर्भगृहामध्ये डाव्या बाजूला स्वार नसलेल्या अश्वाची प्रतिकृती दिसते ती चंद्राचीच असल्याचे मार्तंड भैरव ग्रंथा मध्ये उल्लेखले आहे.
घोड्याचा संबंध शक्तीशी जोडला जात असल्याने घरातील आजार किंवा संकट नाहीसे होण्यासाठी देवाला घोड्याची प्रतिमा अर्पण केल्यास सर्व अरिष्ट दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.


श्वान

श्वानपाताळामध्ये बळीराजाच्या महालामध्ये श्रीविष्णूनी दिलेल्या वचनाला जागून द्वारपाल म्हणून काम करीत असताना सामवेदाने त्यांची कुत्सितपणे चेष्टा केली असता श्रीविष्णूनी त्याला श्वान होऊन भुंकत राहण्याचा शाप दिला व मार्तंड भैरव अवतारामध्ये उद्धार होईल असा उशाप दिला, अशी कथा मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. तर बाळकृष्णाने देव्हा-यातील खंडोबा देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वी खाल्ल्याने देवाने आपली माया दाखवीत त्याचे कुत्र्यामध्ये रुपांतर केल्याची लोककथा प्रसिद्ध आहे.खंडोबा उपसकांमध्ये घोड्याबरोबरच श्वानसुद्धा वाहन असल्याची भावना आहे त्यामुळे खंडोबाच्या मूर्तीबरोबर त्याला स्थान असते. घोडा किंवा कुत्रा स्वप्नामध्ये आल्यास मल्हारी मार्तंडाचा दृष्टांत झाला असे भाविक मानतात.

गाठा किंवा गोफ

गाठा किंवा गोफ

 इंद्र गोष्ठ कंठी बांधोन, वारी मागे शिवा लागून l   

म्हणे मणी मल्ल शत्रू निर्दाळून, सनाथ करी दयाळा l

मणी मल्ल दैत्यांकडून पिडीत झालेल्या ऋषीमुनींसोबत स्वर्गलोकीचे देव कैलासावर पोहोचले त्यावेळी इंद्र देवाने आपल्या गळ्यामध्ये गाठा अडकविल्याचा उल्लेख मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे.
श्रीखंडोबाचे उपासक असलेल्या काही कुळांची घरवाघ्या सोडण्याची प्रथा असते अशा बहुतांश श्रीखंडोबा भक्तांच्या गळ्यामध्ये चांदीचा गोफ दिसतो त्याला गाठा किंवा गोष्ठ असे म्हणतात. दुहेरी पट्टीपासून बनविलेला गाठा हा चांदीचा किंवा पंचधातूचा असतो, एका बाजूला गोलाकार कळस असतो तर दुस-या बाजूला कळस अडकविण्यासाठी पट्टीचा फासा असतो. देवघरामध्ये याची पूजा होत असते तर कुळधर्म कुलाचाराचे वेळी हा गळ्यामध्ये परिधान केला जातो.

दिवटी बुधली

  दिवटी ही दिव्यत्व ज्ञानाचे, तर बुधली ही बोधाचे प्रतिक आहे. दिवटी बुधली धातू किंवा लाकडापासून बनविली जाते. श्रीमल्हारी मार्तंडाच्या पूजादैवातांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे, 'मार्तंड विजय' ग्रंथामध्ये दिवटी आणि बुधलीचे महत्व अधोरेखित केले आहे ते खालील प्रमाणे

मल्ल वधिला जे दिवशी, तेव्हा आनंद झाला सुरवरांसी 

सिंहासनी बैसवूनी शिवासी दीपिका घेउनी तिष्ठती

त्या दिवसापासून दीपिका प्रज्वलीती भक्तजन 

तैलार्थ बुधली धारण दक्षिण करी करावी 

मल्लासूर दैत्याचा संहार केल्यानंतर सर्व देवगणांनी दिपिकेने अर्थात दिवटीने ओवाळिले म्हणून आजही मल्हारभक्तांमध्ये दिवटी बुधली देवघरामध्ये पुजली जाते .खंडेरायाच्या कुळधर्म कुलाचारातील जागरण गोंधळ अथवा तळीभंडार करताना दिवटी अवश्य पेटवावी असा संकेत आहे.

संत एकनाथ महाराज म्हणजे समाजसुधारकांमधील अग्रणी, आपल्या लिखाणातून भक्ती मार्गातील काटे वेचून बाजूला टाकून फुलांना आकर्षक पद्धतीने सजविण्याची कला त्यांच्याकडे होती. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर शब्दातून कोरडे ओढत असतानाच भक्ती मार्गातील एखाद्या सत्कृत्याचे उन्नतीकरण करत प्रबोधनाचे मोठे महत्कार्य त्यांनी केले. संत एकनाथ महाराजांनी श्रीमल्हारी मार्तंडाची भक्ती करीत असताना दिवटी बुधलीचे सुंदर रूपक सादर केले आहे. मुरुळीकडे विषय वासनेच्या नजरेने पाहणा-या समाजावर जोरदार प्रहार करीत असतानाच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडणा-या दिवटीमध्ये तेलरुपी बोध देणा-या बुधलीचा पुरस्कार केला आहे.

इच्छामुरुळीस पाहूं नका पडाल नरकद्वारी ।
बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी ।।


कोटंबा

कोटंबा

पात्र पूर्णैः म्हणजे,पूर्णपात्र कोटंबा प्राकृत बोलती सर्वत्र

कुलधर्म कुलाचाराचे वेळी कोटंबा पूजन करून अन्नदान केले जाते. मणी मल्ल दैत्यांसोबत युद्ध करून विजय मिळविल्या नंतर सप्त ऋषींनी श्री मार्तंड भैरवास आपल्या आश्रमा मध्ये पूजन करून तोषविले व पात्रामध्ये अन्न वाढीले त्याच पूर्णपत्राने सर्व देवसेनेस अन्न पुरविले. अशी कथा पूर्णपात्राविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये तेहतिसाव्या अध्यायामध्ये दीली आहे,

पात्रे भरून विपुल अन्न, देती याचकांलागून
पूर्णपात्र असे अभिधान, ऋषी ठेविती ते समयी 
ती जगी प्रसिद्ध जाली कुलधर्म करुनी पूजिती चंद्रमौळी
ते दिवशी याचक वाघे मुरुळी यांची पात्रे अन्ने करून भरिजे
 कोटंबा चौकोनी व लाकडी, धातूचा किंवा पाषाणाचाही असतो. कुलधर्म कुलाचाराचे वेळी वाघ्या कडून कोटंबाचे पूजन केले जाते.    

भंडारी

भंडारी
वाघ्याच्या गळ्यामध्ये श्रीखंडेरायाचा प्रिय असा भंडार ठेवण्याची चौकोनी पिशवी असते त्यालाच भंडारी असे म्हणतात. भंडारी व्याघ्रचर्म किंवा अन्य कातड्यापासून बनविलेली असावी असा संकेत आहे परंतु काही वेळा ती कापडीही आढळते. जागरणाचे वेळी वाघ्या उपस्थित असलेल्या प्रत्येकाला यातील भंडारा कपाळी लावतो.

गळयामध्ये घालूनिया भंडारी
उभा असे सदगुरुनाथांचे द्वारी
कर जोडूनी मागतो वारी

घोळ किंवा घोळक

कैलासीहून मदनदहन,
निघे मणीमल्ल वधालागून,
तेव्हा घोळक वाद्य लोहाचे निर्मून,
हाती घेऊन वाजवीत असे,
ते वाद्य प्रिय मार्तंडासी,
ते कृपेने दिधले वाघ्यांसी

श्रीशंकर कैलासाहून मणी मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी लोहाचे घोळक वाद्य निर्माण केल्याचा उल्लेख मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. 'घोळ' दिसायला तलवारीच्या मुठीसारखे असते, त्याच्या अर्धगोलाकार तारेमध्ये छोट्या छोट्या चकत्या किंवा कड्या अडकविलेल्या असतात, त्या एकमेकावर आदळल्याने नाद निर्माण होतो. वाघ्याकडे हे वाद्य आढळते.

चंग
डीमडी अथवा खंजिरी वाजविताना वाघ्याच्या अंगठ्या
मध्ये लोखंडी कडी अडकविलेली असते त्याला चंग
म्हणतात.


श्रीक्षेत्र कडेपठार देवता लिंग

मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने  सप्तऋषींच्या विनंतीवरून श्रीमार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया शक्ती ने तेहतीस कोटि गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले ते धवलगिरीच्या पठारावर, तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. याठिकाणी अवतरल्या नंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली "या भूमीवर लिंग रूपाने आपण सदैव राहावे." सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-या मार्तंड भैरवाने तथास्तु म्हंटले व धवलगिरीवर द्विलिंग प्रकट झाले. आज कडेपठार किंवा जयाद्री पर्वत म्हणतात तो मूळचा धवलगिरी, युद्धासाठी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर काही काळ याला प्रस्थपीठ म्हणूनही संबोधले जात होते. अशा या महत्व पूर्ण स्थानाची आंपण माहिती करून घेऊ.
जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेस साधारणपणे साडेतीन किलोमीटरवर जयाद्रीच्या पठारावर कडेपठार देवतालिंग हे श्रीखंडोबाचे स्थान आहे यालाच काहीलोक जुनागड असेही म्हणतात. जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विजाळ विहीर परिसर आहे, इथपर्यंत डांबरी सडक असल्याने गाडीने जाता येते तेथून पुढे पायरी मार्गाने दीड किलोमीटर अंतर चढून गेल्यावर मंदिरात पोहोचता येते. वाटेमध्ये हेगडी प्रधान मंदिर, भगवानगिरी माठ, गणेश मंदिर व राम मंदिर लागतात. मुख्य मंदिराला पूर्वी तटबंदी अस्तित्वात होती परंतु कालौघात बरीच पडझड झालेली दिसते. साध्य स्थितीमध्ये मंदिराच्या वायव्य दिशेकडून मंदिर आवारामध्ये प्रवेश होतो,तेथून पुढे डावीकडे गेल्यानंतर पूर्वेकडे नंदिमंडप त्याचे पाठीमागे पूर्वेकडील प्रवेश द्वार व त्यावरील नगारखाना दिसतो. नंदी मंडपामध्ये दोन नंदी आहेत त्यामागे एक कथा सांगितली जाते  'गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली त्याचे प्रतिक म्हणून श्रीमार्तंड भैरवाच्या नंदिसोबत गणांचा नंदी सुद्धा सेवेसी ठेवण्याची विनंती केली व ती देवांनी मान्य केली.'नंदी मंडपापुढे मोठे कासव आहे अलीकडील काळात त्याच्यावर ग्रेनाईट फरशी बसविण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सदर, मध्य गर्भगृह व मुख्य गर्भगृह असे विभागलेले आहे. सदरेवरून मध्य गर्भगृहामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजयच्या दगडी मूर्ती आहेत. मध्य गर्भ गृहामध्ये दगडी कासव व पितळी कुत्रा आहे. मुख्य गर्भ गृहामध्ये खालील बाजूस खंडोबा-म्हाळसा स्वयंभू द्विलिंग आहे तर त्याच्या पाठीमागे पितळेच्या नाग, घोडा, कुत्रा, व महिषासुर मार्दीनीची मूर्ती आहेत. त्यापाठीमागे प्रभावळी मध्ये श्रीखंडोबा म्हाळसा चा पितळी मूर्ती जोड आहे,त्याच्या पाठीमागे भिंतीच्या मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची बैठी चतुर्भुज दगडी मूर्ती आहे, त्यासोबतच दोन्ही बाजूना देवीमूर्ती आहेत. कोनाड्याच्या बाहेरील एका बाजूस गणेशाची संगमरवरी मूर्ती व दुस-या बाजूस श्रीमार्तंड भैरवाची छोटी दगडी मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहामध्ये दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोलीमध्ये देवाचे शेजघर आहे. मंदिर आवारामध्ये आग्नेयेकडेकडे पश्चिमाभिमुख दत्त मंदिर आहे. तर दक्षिणेकडील बाजूस ओव-या व एक प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडील ओवरीमध्ये देवाचे भंडार गृह आहे येथे घटस्थापनेवेळी उत्सव मूर्ती या ठिकाणी बसवितात. भंडार गृहाशेजारील ओवरीमध्ये अलीकडील काळामध्ये स्थापनी झालेली घोड्यावर स्वार झालेल्या श्रीखंडोबाची मूर्ती आहे. त्याच्या मागील बाजूस पश्चिमेकडे श्रीपंचलिंग मंदिर आहे.आहेत. आवाराच्या पूर्वेकडील दरवाजाचे बाहेरील बाजूस छोटा दगडी पार आहे व त्यावर बगाडाचा खांब आहे. संन्यासी आणि अध्यात्मिक गुरु यांचे दृष्टीने या स्थानाला अनन्य साधारण महत्व असल्याने या पठारावर अनेक छोटी मोठी समाधीस्थळे आढळतात.मंदिर कोणी व केव्हा बांधले याविषयी कुठेही उल्लेख आढळत नाही.श्रीराम मंदिराव्यतिरिक्त इतरत्र कुठेही शिलालेख सापडत नाहीत.


जेजुरीगड श्रीखंडोबा मंदिर

मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्या नंतर त्यने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्ला चे नाव घेतले जाते तर मानिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊ या.     
जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी-मार्तंडाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीनबाजूनी  पायरीमार्गांनी जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पाय-या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितील असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस पुर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढविली आहे. या पायरी मार्गावर तीनशे पंच्याऐंशी पाय-या आहेत तर सुस्थितील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशे दीपमाळा आहेत. Imperial Gazetteer of India 1885 नुसार या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्या त्यापैकी दोन कमानी भग्न अवस्थेत पहावयास मिळतात. जेजुरगडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा ( दगड ) संदर्भात हा उल्लेख आलेला आहे.
पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते.त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके  भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते.त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत. सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाच्या उजव्या हाताला संगमरवरी यक्षाची मूर्ती दिसते तर डावीकडील बाजूस दगडात कोरलेला गणपती आहे.मुख्य गर्भागृहाम्ध्ये प्रवेश करताना समोर दिसतो तो मेघडंबरीतील भव्य मोठा देव्हारा. समोर खालील बाजूस श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभूलीग दिसते, श्रीखंडोबा स्वयंभूलिंग हे म्हाळसा स्वयंभू लिंगापेक्षा आकाराने मोठे आहे, त्याला लागुनच पाठीमागील बाजूस बाणाईचे लिंग आहे, त्याच्या बाजूला गणेश मूर्ती, पितळी कुत्रा व श्रीखंडोबा म्हाळसा उत्सव मूर्तीचे दोन जोड आहेत. त्याच्या पाठीमागील कट्ट्यावर श्रीखंडोबा म्हाळसाचे तीन मूर्ती जोड पहावयास मिळतात त्यापैकी दोन मोठे मूर्तीजोड प्रभावळीसह आहेत. डावीकडील चांदीचा मूर्तीजोड नाना फडणविसांनी पेशव्यांना वारस मिळावा म्हणून केलेल्या नवसपूर्तीप्रित्यर्थ अर्पण केलेला आहे तर त्याच्या शेजारील छोटा मूर्तीजोड सातारकर भोसले छत्रपतींनी अर्पण केलेला आहे. उजवीकडील मूर्ती जोड तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील शरीफजीराजेंनी अर्पण केला आहे. या मूर्तींच्यापाठीमागे भिंतीतील मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची चतुर्भुज बैठी मूर्ती आहे, यांच्या आसनाखाली मणीसूर व मल्लासुर दैत्यांच्या शिरासोबत घोडा आहे. श्री मार्तंड भैरवाचे दोन्ही बाजूस देवींच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहात उत्तर व दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोली आहेत पैकी दक्षिणेकडील खोलीत देवाचे शेजघर असून त्यामध्ये देवाचा चौपाळा आहे. उत्तरेकडील खोलीमध्ये तळघर असून तेथे श्री खंडोबा बाणाई स्वयंभू लिंगाचे गुप्तमल्लेश्वर स्थान आहे ते फक्त महाशिवरात्रीस खुले असते.मंदिर प्रदक्षिणा मार्गावर त्रेसष्ठ ओव-या आहेत पैकी काही ओव-यांचे अलीकडील काळात बांधकाम करून खोलीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या पाठीमागील भिंतीमध्ये कोनाड्यात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे.प्रदक्षिणा मार्गावर तुळजाभवानी, पंचलिंग, भुलेश्वर, अन्नपूर्णा व साक्षीविनायक मंदिरे आहेत, तसेच गणेश मूर्ती,उमाजी नाईक तालीम, घृतमारी शिळा, मल्हार पद, मारुती आणि बारद्वारीतील देवघर व देवाची पालखी पहावयास मिळते. पंचलिंग मंदिराला लागुनच देवाचे भंडारगृह आहे, याठिकाणी देवाच्या उत्सवमूर्ती दसरा व सोमवती अमावास्येला बसविल्या जातात.



श्रीक्षेत्र पाली

 पाली हे गाव सातारा - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील काशिपासून पश्चिमेस ७ कि. मी. अंतरावर आहे . या शहराची १९९१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५,६७२  इतकी होती . काशि येथून एस. टी. व खासगी वाहने सतत काशीळ ते पाली येजा करीत असतात . तारळी नदीमुळे या गावाचे दोन भाग झाले आहेत . नदीच्या दक्षिण - पश्चिमेस भागास पाली आणि उत्तर - पूर्वेच्या भागास राजापूर म्हणतात . 

Khandoba Pali

खंडोबाचे देऊळ राजापूर भागात आहे . हे या भागाच्या पूर्वेस तटबंदी व फरसबंदी प्रकारात पूर्वाभिमुख बांधलेले आहे. या तटास पूर्व दक्षिण उत्तर या दिशांना तीन दरवाजे आहेत. दक्षिण दरवाजा अधिक मोठा असून अधिक वापर याच दरवाज्याने होत असतो तटास लागून  सर्वत्र ओव-या काढल्या आहेत त्यांचा यात्रेकरूंना उतरण्यास उपयोग होतो. पूर्व दरवाजाने आत शिरताच दोन्ही अंगास दोन दीपमाळा आहेत. उजव्या दिपामालेच्या नैऋत्येस आणखी एक दीपमाळ, तिच्या पलीकडे पितळी पत्र्याने मढविलेल्या हत्तीची मंडपी आणि तिच्या ईशान्येस आणखी एक दीपमाळ आहे. दरवाजासमोर नंदीची मंडपी असून तिच्या उत्तर दक्षिण बाजूस चार दीपमाळा तसेच तुळशी वृंदावन व खंडोबाचे एक लहानसे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. यातील मूर्ती बैठी चार हातांची व त्यात एक खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपात्र घेतलेले आहे. मूर्तीच्या मांडीखाली दोन्हीकडे दोन दैत्यांची मुंडकी आहेत. यापुढे सोळखांबी दगडी मंडप लागतो त्याच्या बाहेरच्या सर्व खांबास लागून टेकण्याचा कट्टा असून मधले सर्व खांब पितळी पत्र्याने मढविले आहेत. पत्र्यावर कुठे उठावाच्या, तर कुठे रेखामय आकृत्या काढल्या आहेत. तसेच फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख असल्याने हा मंडप प्रसिद्ध मराठी सेनापती धनाजी जाधव यांनी बांधला अशी समजूत झाली आहे.
पाल यास खंडोबाचे पाल म्हणून ओळखतात, एका अख्यायिकेनुसार या गावात पालाइ नावाची गवळण खंडोबाची भक्त होती तिच्या नावावरून गावास पाल हे नाव मिळाले.


सोप्यावर एका फरशीवर 'पडळोजी अबा बिन बाबसेटी करडोई' असा लेख आहे याचेच वाचन 'अबां बिन शेटी पघोडे' असे केले जाते. सातारा ग्याझेटियर मध्ये पालीचे वर्णन खालील प्रमाणे करण्यात आले आहे, 'सदर खंडोबाचे मंदिर ५०० ते ५५० वर्षापूर्वी अबा बिन शेटी पाघोडे नावाच्या वाण्याने बांधले. मंदिराचा मूळ ढाच्या म्हणजे दगडी बांधकामाचे गर्भगृह व त्याच्या बाहेरील बाजूस १०.६६ x ८.५३ मीटरचा द्वारमंडप आहे. द्वारमंडप चार स्तंभावर आधारलेला असून स्तंभ साधे आहेत. स्तंभाचे मध्यस्तंभ (shaft) चौरसाकृती , अष्टकोनी व गोलाकार आहेत. सर्व स्तरातील लोकांचे पालीचा खंडोबा हे दैवत आहे. गर्भगृह १.४८ x १.४८ मीटरचे असून त्यात दोन लिंगे आहेत, त्यापैकी एकावर खंडोबाचा तर दुस-यावर म्हाळसाबाईचा पितळी मुखवटा आहे. त्याच्या शेजारीच उजव्या बाजूला काळ्या दगडाची खंडोबाची दुसरी पत्नी बानूबाईची मूर्ती आहे. तसेच पाठीमागे त्याचा मुख्य प्रधान हेगडी पेंढारी व त्याची पत्नी यांच्या घोड्यावर बसलेल्या पितळेच्या मूर्ती आहेत. द्वारमंडपातील उत्तरेकडील देवळीत गणपतीची व दक्षिणेकडील देवळीत सिद्धवासिनीची मूर्ती आहे. मुख्यमूर्तीवर सतत पाण्याचा अभिषेक होण्यासाठी उत्तरेकडून एक दगडी नळी काढण्यात आली असून तिच्या खाली दगडी घोड्याची मूर्ती आहे.

Khandoba Pali
शिवाजी व राजारामाच्या कालावधीत प्रसिद्धीस असलेल्या सेनापती धनाजी जाधवने मंदिराच्या प्राकारात ६.३ x ६.३ मीटरचा मंडप बांधला आहे. तो सर्व बाजूने उघडा आहे.हा १२ स्तंभावर आधारलेला असून गाभा-याच्या देवडीच्या उंचीएवढा आहे. ता सभोवती लोकांना बसण्यासाठी दगडी बैठक आहे. मंडपाचे छत विस्तीर्ण असून त्यावर पागोळ्या व त्याखाली कोरीव भिंती आहेत. संपूर्ण मंडपाचे बांधकाम दगडी असून त्याखाली स्तंभांना रंग रंगोटी केलेली आहे. त्यापैकी काही स्तंभ नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने मढविलेले आहेत. मंडपाच्या प्रत्येक कोप-यावर लहान कळस आहेत व मध्यभागी लहान शिखर आहे द्वारमंडपावर शिखर असून गाभा-यावर ही मुख्य शिखर आहे. सर्व शिखरे विटांची असून त्यास ठीक ठिकाणी देवळ्या आहेत. त्यामध्ये देव देवतांच्या मूर्ती बसविल्या आहेत.'मंदिराच्या प्राकारामध्ये पूर्व पश्चिम ४२.६२ मीटर व उत्तर दक्षिण २४.३८ मीटर रुंदीचा फरसबंदी चौक आहे. या चौकात वायव्येस ओंकारेश्वर महादेवाची मूर्ती व नैऋत्येस हेगाडीची मूर्ती आहे. मंडपाचे समोर पूर्वेला दगडी छताखाली पितळी पत्र्याचे आवरण असलेला नंदी आहे. त्याच्या दोन्ही बाजूला घडीव दगडांच्या ३.५७ मीटर उंचीच्या दोन दीपमाळा आहेत. दीपमाळा गज व वृषभ यांनी  तोलून धरलेल्या असून खालच्या बाजूस मानव, पशु व वृक्ष, वेलींचे कोरीव काम आहे. याच्या पुढे पूर्वेला नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने अच्छादलेला दगडी हत्ती आहे त्यावर दगडी छत आहे.


Khandoba Pali

नंदीच्या दक्षिणेस शिवाजी महाराजांच्या काळातील लहान देऊळ असून त्याच्या उत्तरेला तुळशी वृंदावन आहे. प्रांगानाची भिंत ६.०९ मीटर उंचीची असून, तिच्या पश्चिमेला वायव्येला दक्षिणेकडील अर्धा भाग व पूर्व बाजूच्या उत्तरेकडील अर्ध्या भागात चिरेबंदी दगडांचे बांधकाम केलेले मठ आहेत. त्यांना नक्षीकाम केलेल्या कमानी आहेत. या मठाचे सुरवातीचे बांधकाम मराठा सरदार शिंदे व उर्वरित बांधकाम धनाजी जाधवने केले आहे. मठाचे बाहेरील छत सपाट असून त्याचा गच्चीसारखा उपयोग केला जातो मठाची दालने एकसारखी नाहीत याचा उपयोग भक्तांना व प्रवाशाना राहण्यासाठी तसेच देवाचा घोडा ठेवण्यासाठी होतो. प्रांगणात मध्यभागी कोरलेली मोठी कूर्मशीला आहे. नंदी व द्वारमंडप यांच्या मधोमध ही कोरलेली मोठी कूर्मशिळा असून ती पितळी पत्र्याने मढविलेली आहे. प्रांगणाला  तीन प्रवेशद्वारे आहेत.पूर्वेकडील प्रवेशद्वार लहान असून आतील बाजूस ९.१४ मीटर उंचीच्या दोन दीपमाळा आहेत. प्रत्येकीवर दिवे लावण्यासाठी १२ कोरीव खोबण्या आहेत. 

 
Khandoba Pali

प्रवेशद्वाराचे व या दीपमाळाचे बांधकाम नेरच्या पाटील यमाजी चव्हाणने केले आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वार ( शिंदे मठाजवळील ) लहान असून ते शिंध्यांनी बांधले आहे.दक्षिणेकडील धनाजी जाधवच्या माथाजावालील प्रवेशद्वार मुख्य असून ते ३.६५ मीटर उंच व ५२ मीटर रुंद आहे. हे सुस्थितीत असून सुंदर आहे. याच्या आतमध्ये भिंतीच्या बाजूला मठाची दोन दालने असून टी मुधोळच्या घोरपडयांनी बांधली आहेत.त्यापैकी एका दालनात गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्यावर सुशोभित नगारखाना असून नगारखान्याचे व प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम रहिमतपूरच्या मान्यांनी केले आहे. प्रांगणातील जागाही दगडी फरसबंदीची आहे.
येथे वर्षाला अनेक यात्रा भरतात पैकी पौष महिन्यातील शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्रीखंडोबा व म्हाळसा विवाहा निमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये सात ते आठ लाख भाविक सहभागी होतात. या विवाह सोहळ्यानिमित्त विविध गावचे मानकरी व-हाडी म्हणून येत असतात. नारळाच्या झावळ्या, फुले, तोरणे यांनी सजविलेल्या बैलगाड्यांमधून श्रीखंडोबाची व-हाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघतात. प्रत्येक व-हाडी मंडळींच्या पुढे वाद्यवृंद असतो आणि सारे आनंदात नाचत 'सदानंदाचा येळकोट' गजर करीत विवाह मंडपाकडे रवाना होतात. त्यावेळी भाविक भंडार उधळतात. व-हाडी मंडळी मागून मुख्य कमानी पर्यंत घोड्यावर आणि नगरपेठेमध्ये हत्तीवर विराजमान होत श्रीखंडेरायाचे मुखवटे घेऊन गावचे मानकरी पाटील येतात आणि भाविकांचा एकच जल्लोष होतो. भंडाराने भरलेल्या खोब-याच्या वाटया हत्तीवर बसलेल्या मल्हारी मार्तंडाच्या दिशेने चोहोकडून जात असतात. अगदी उत्साहाच्या वातावरणात हा परना तिन्ही सांजेच्या आगोदर विवाह मंडपामध्ये पोहोचते. मानपानाचा विधी झालेनंतर गोरज मुहूर्तावर श्रीखंडोबा म्हाळसा विवाह सोहळा मंगलाष्टका गाऊन पार पडला जातो

Khandoba Pali


Bookmark and Share