Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

कुलधर्म कुलाचार

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान वाटत असतो, पण कुळ म्हणजे काय ? कुलधर्म कुलाचार म्हणजे काय ? त्याचे पालन कसे करायचे ? कुलस्वामी खंडोबाचे कुलाचारातील विधी कसे पार पाडायचे वगैरे संपर्ण  माहिती

कुळधर्मु चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुज सरळी दिधली आहे  --ज्ञानेश्वरी

आपला कुलधर्म पाळावा, कुलाचारांचे आचरण करावे तसेच शास्त्रांनी सांगितलेली सत्कर्मे जरूर करावीत व ज्या कर्मांचा निषेध केला आहे ती कर्मे टाळावीत इतके केले म्हणजे सुखाने वागावयास मोकळीक आहे.


कला व संस्कृती

श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनहीप्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभा शाली अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते. अनेक लहान मोठे कलाकार या नगरीमध्ये जन्माला आले, वाढले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जेजुरनगरीचे जगभर गाजविले. शाहिरी, गायन, तबला आणि ढोलकी वादन, हार्मोनियम, चित्रपट, नाटय आणि तमाशा अशा सर्वच कलाप्रकारामध्ये जेजुरीचे तारे चमकले आणि अजूनही त्यांची घोडदौड तशीच चालू आहे.

किल्ले पुरंदर

वीर मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाने अजरामर केलेल्या या किल्ल्यावर बिनी दरवाजातून पुढे प्रवेश करताक्षणीच त्यांचा भव्य असा पुतळा दिसतो.पुरंदर व रुद्रमाळ किंवा वज्रगड हे डोंगराच्या एकाच सोंडेवर असले तरी दोन स्वतंत्र किल्ले आहेत. छत्रपती संभाजीराजांचा व सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे,किल्ल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.



Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

618;468;038991905e11b8cce71a6c91c15c2d250694067b618;468;ff48e588e7d008133aaada6220672009587e0ecd618;468;d39e03ca2f326ba2c08c1c794f747af9b642a08c618;468;0e56616dad040cc22734ce4dce03594af7228916618;468;60646df0f4cef6719c8e852c555885f60a37bee8618;468;2733d642df4766fb2e24bdc9ac573e13a7021510618;468;7e836d2038f28ba96ede3060aed67e86dcd8c781618;468;0ecaa5ca66716f1a9446bd1947cae10958c0739c618;468;d3c2b9d6c551fd44aa8ea949175b04a594a27e95618;468;38eb5b30280d9180812560df5221e411a16e1261618;468;c45e564706c17ffef767c0ce0d8e117860308835618;468;b95c3ce576d48914d86c9fe331f946e0acfd4d57

देवपूजा

दैनंदिनदेवपूजा हे अध्यात्मिक सौख्य मिळविण्याचे एक उत्तम साधन आहे. हल्लीच्या संघर्षमय काळात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी आपणाला जास्त वेळही मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करावी.यथाशक्ती, यथामती आणि मिळतील त्या उपचारांनी देवपूजा मनोभावे केली तर मनाला शांती मिळते, घरातील वातावरण पवित्र होते, प्रसन्नता प्राप्त होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.

देवपूजा करणा-यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते, अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो आनंद होतो.
देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात. आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे. तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.
दैनंदिन आपल्या देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो. बाकीचे लोक स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला नमस्कार करतात. पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र, गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा, पोथी यांचे वाचन करावे.अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे, प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत. त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.
देव पूजेच्या वेळी बसण्याचे नियम..
देव नेहमी आपल्या समोर उच्च आसनावर ठेवावेत. आपल्या उजव्या बाजूस पूजेचे साहित्य व डाव्या बाजूस पाण्याचा तांब्या ठेवा.देवाच्या चौरंगावर देव्हा-यात आपल्या उजव्या बाजूस शंख व आपल्या डाव्या बाजूस घंटा ठेवावी. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेला दिवा ठेवावा.
दर्शनाला जाताना व पुजेला बसताना काही सूचना
चप्पल घालून देवाच्या पुजेला जावू नये. ( अपवाद )
वाहनात बसून पूजेला जावू नये. ( अपवाद )
देवाची उत्साहात सेवा करावी.
देवळात गेल्यावर देवाला साष्टांग नमस्कार घालावा.
अशौचात देवाची पूजा करू नये.
गप्पा मारीत, बडबड करीत पूजा करू नये.
खोटे बोलत मोठ्याने ओरडत पूजा करू नये.
स्त्रियांचा अनादर व अश्लील गप्पा मारत पूजा करू नये.
स्नान करून उत्साहाने, आनंदाने देव पूजा करावी
देवाची पूजा सकाळीच का करतात ?
देवाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळच सर्वश्रेष्ठ सांगितली गेली आहे. तस पाहायला गेले तर दिवसभरात शुध्द मनाने कधीही देवाची पूजा करता येते. परंतु ब्रह्म मुहूर्तावर देवाची पूजा करण्याचे विधान शास्त्रात सांगितले गेले आहे.
शास्त्रानुसार देवाच्या भक्तीसाठी सकाळची वेळ उत्तम आहे. कारण सकाळी आपले मन शांत असते. झोपेतून उठल्यानंतर मन पूर्णपणे शांत आणि स्थिर असते. डोक्यात इतर व्यर्थ विचार नसतात. देवाच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणे खूप आवश्यक आहे. मन एकाग्र असेल तर ध्यान लावणे सोपे जाते.
सकाळनंतर दिवसभरात आपण विविध कामे करीत असतो. त्या कामामुळे आपले मन स्थिर नसते. मन अशांत असेल तर विविध अधार्मिक गोष्टी मनात येण्याची शक्यता असते. या गोष्टींमुळे शास्त्रामध्ये ब्रह्म मुहूर्तावर पूजा करणे सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले गेले आहे.
जो व्यक्ती शांत आणि एकाग्र मनाने देवाची भक्ती करतो देव त्याच्यावरच लवकर प्रसन्न होतात. सकाळी केलेल्या पूजेमुळे मन शांत राहते, त्यामुळे दिवसभराची कामे नीट पार पडतात. एकाच वेळेस अनेक कार्य व्यवस्थित पूर्ण केले जाऊ शकतात. त्यामुळे सकाळी देवाची पूजा करण्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे.

मल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सवातील कुळधर्म कुलाचार

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ।।
ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म ।
त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।
--
संत मध्वमुनीश्वर

श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव अर्थात चंपाषष्ठी उत्सव बुधवार, दिनांक २७/११/२०१९ रोजी सुरु होत आहे. अश्विन महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या कुलस्वामिनी देवीचे नवरात्र असते, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये, कुलस्वामी खंडोबाचे षडःरात्र असते, बोलीभाषेमध्ये याला श्रीखंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. या उत्सवाविषयी "मार्तंड विजय" ग्रंथामध्ये पार्श्वभूमी सांगितली आहे ती थोडक्यात अशी 'उन्मत्त झालेल्या मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला व त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. त्यावेळी सप्तऋषींनी मार्तंड भैरवाच्या विजयासाठी प्रतिष्ठाण स्थापण केले व जसे जसे देवसेनेला विजय मिळू लागला त्या समयी स्थापित केलेल्या प्रतिष्ठाणवर विजयमाला चढू लागल्या, सहा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये सहाव्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त झाल्यानंतर प्रतिष्ठाण विसर्जित करण्यात आले. याच प्रतिष्ठाणचा विधी आपण षडःरात्रोत्सव स्वरूपामध्ये साजरा करीत असतो.

श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये षडःरात्रोत्सव कालावधीत विविध प्रकारच्या पूजा आणि कुलाचार केले जातात. यामध्ये

  • पंचामृत अभिषेक,
  • भंडारपुजा,
  • दहीभात पुजा,
  • वस्त्रालंकार पुजा,
  • पुष्पपुजा,
  • तैलस्नान (तेलवण)
  • जागरण, गोंधळ, लंगर,
  • नैवेद्य
  • आणि अन्नदान

दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी श्रीमार्तंड भैरव अवतार झाला, त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ( एक वेळ आहार, गोड आहार, तिखट आहार किंवा फलाहार ) आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.

  • मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा,

          (मंगळवार, दिनांक १५ डिसेंबर २०२०)     

आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे. सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे. नंदादीप घासून  पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ताम्हणामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी.

  • मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

          (बुधवार, दिनांक १६ डिसेंबर २०२० ते शनिवार, दिनांक १९  डिसेंबर २०२०)

रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा. फुलांची माळ तयार करून घटावर लावावी. शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी, आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे. मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे,

  • मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

         (शनिवार, दिनांक १९  डिसेंबर २०२०)

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्हीसांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे.

          (रविवार, दिनांक २०  डिसेंबर २०२०)

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.
देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी, चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलांची माळ लावावी.दिवटी प्रज्वलीत करून देवांना ओवाळावी. पुरणा - वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा. घटोत्थापन करून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळीभंडार करावा, उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे.


तळीभंडार

हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे.....

ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास होतोच....
प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये विजयादशमी ( दसरा ) व चंपाषष्ठी यादिवशी हा विधी होत असतो.
तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या
आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच तळी भंडा हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर तळी भंडाराचा विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा विधी व मंदिरामध्ये केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून देवापाशी आनंद मागितला जातो.

खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार असा वाढत जावा तर दुसरे असे की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर उधळल्या जात असत परंतु कालौघात मोहरा शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते  सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी  महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक देवाला पोहोचते 

घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी

ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने, सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते तदनंतर पानाचा विडा ठेवून(काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते.एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.


स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे l त्यामाजी अष्टदळ काढावे l
भंडारे पूरित करावे l मध्ये कलश स्थापिजे ll
नागवेलीदळेकरून l कलश सुशोभित करावा जाण l
कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून l तळीकेचे पूजन करावे ll
मुष्टीभंडार आत ठेवावा l आप्त परकीय समुदाय मेळवावा l
येळकोट नामाचा उच्चार करावा l एकावच्छेदे करुनिया ll
तळी उचलून आधारपात्रावर ठेविजे l मग भंडार सर्वांस लाविजे l
प्रसाद सर्वांस वाटीजे l अत्यादरेकरुनिया ll
तळी भरावयाचे समयी l दीपिका करी असावी l
मग तळी पुन्हा उचलावी l मस्तकी धारण कीजे ll

------- तळीभंडार ---------

 

हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......

अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका .........भांडाराचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........

बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
भंडारा उधळी......  देवाच्या दारी 
घोळ कोटंबा........  लंगर झेंडा
गळा भंडारी..... हाती खंडा....  
 वारूवर स्वार ..... देव मल्हार....... 
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........

खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........




जागरण - गोंधळ

गोंधळ

विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद सुरामध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मीयांमध्ये गोंधळाची परंपरा सुरु झाली, महाराष्ट्रा मध्ये याची खूप मोठी परंपरा आहे.  विशेषत: तुळजाभवनी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा, गळ्यात कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकडा गोंधळ' असे म्हटले जाते. देवीचा गुणगान गाणारा तो गोंधळी.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा धार्मिकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्याठिकाणी गोंधळ घालावयाचा आहे त्या ठिकाणी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते अथवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडून उसाच्या किंवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार केला जातो व त्याला पुष्प माळा बांधली जाते. याला गोंधळाचा चौक असे म्हणतात. दिवटे पेटवतात, दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

तुळजापूर भवानी आई गोंधळाला यावं...
कोल्हापूर अंबाबाई गोंधळाला यावं ...
गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं .... 

कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्य दैवते अशा सर्व दैवतांना गोंधळावर येण्याचे आवाहन केल्यांनतर देवीचे स्तवन करणारी पदे म्हंटली जातात त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागुनी
विविध तापाची करावया झाडणी
भक्ता लागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा.... जोगवा मागीन

गोंधळयांकडे विवध वाद्ये असतात त्यापैकी संबळ हे सर्वात महत्वाचे वाद्य असून त्याच्या सोबतीला तुणतुणे व टाळही असतात. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे गोंधळी फार थोडेच शिल्लक राहिले आहेत तर आता बदलत्या जमान्याप्रमाणे त्यांचा ही वेश बदलला आहे.


 जागरण


घर तेथे घराणे, घराणे तेथे कुळ, कुल तेथे कुळधर्म कुलाचार हा पाळलाच पाहिजे हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. कुलस्वामी श्रीखंडेरायाच्या कुलाचारांमध्ये 'जागरण' प्रमुख भाग आहे, जसा देवीच्या कुलाचारातील गोंधळ हा प्रमुख भाग आहे तितकेच महत्व जागरणाला आहे. आज धावपळीच्या जगामध्ये जागरण हा शब्द रात्रभर जागणे यापुरता मर्यादित स्वरुपात पाहिला जातो परंतु जागरण या शब्दाचा अर्थ जागृत करणे होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी जागृत करणे म्हणजे जागरण. आज याच्याकडे लोककला म्हणून पहिले जाते, अनेक लोककलांची जननी म्हणूनही जागरणातील वाघ्या मुरुळी यांच्या कलेकडे बघितले जाते. जागरणाच्या परंपरेविषयी वाघ्या आपल्या कथनातून सांगतो कि पहिले जागरण श्रीकृष्णाने घातले होते म्हणून ते सर्वाना लागू झाले.
जागरणाची मांडणी ही गोंधळा प्रमाणेच असते पाटावर स्वच्छ पीत वस्त्रावर धान्याचे अष्टदल काढून अथवा धान्याची रास करून त्यावर श्रीफळासहित कलश मांडला जातो. उसाच्या अथवा ज्वारीच्या पाच ताटांचा मांडव तयार करून त्यावर पुष्पमाला अड्कविली जाते. विड्याच्या पानावर सुपारी ठेवून या चौकावर खंडोबाचा टाक किंवा मूर्ती मांडली जाते. या चौकासमोर वाघ्या आणि मुरुळी गीत नृत्यामधून कुलस्वामी श्रीखंडेरायाची स्तुती करतात त्याबरोबरच यजमानांसाठी सुख समृद्धी भरभराट व आरोग्य मिळण्यासाठी विनवणी करतात. पुराणातील कथांचा  वर्तमानातील दुष्कृत्यांशी संबंध जोडीत भाविक भक्तांना सोबत घेऊन चालणारा हा धार्मिक विधी म्हणजे मल्हारी कथन, मनोरंजन व प्रबोधन याचा सुंदर मिलाप होय.
या सादरीकरणामध्ये आवाहन, गण, कथन व आरती अशी विभागणी असते तर वाघ्याच्या हातामध्ये डीमडी व मुरुळीच्या हातामध्ये घाटी(घंटी), सोबत करणा-यांकडे टाळ व तुणतुणे असते. जागरणाची सुरुवात करताना सर्व देवतांना चौकावर येण्याचे आवाहन केले जाते......


"जेजुरीच्या खंडेराया जागराला या....या...
वाईच्या तुम्ही गणराया जागराला या....या...

अशा रितीने आवाहन झाल्यानंतर गण म्हंटला जातो त्यानंतर भाविक भक्तांनी मांडलेल्या जागरण विधीमध्ये वाघ्या मुरुळी भक्तांच्यावतीने मल्हारी मार्तंडाला विनवणी करतात....
 

देवा तूची खंडोबा तुझा त्रिभुवनी झेंडा
रूप आगळे दिसे पिवळे नाव तुझे प्रचंडा
हातामध्ये सोन्याचा खंडा
हात जोडितो पदर पसरतो देवा येऊ नका रागा
झोपले असतील भक्तांचे देवा व्हावे आता जागा..


मल्हार कथा ऐकवली जाते तर सरतेशेवटी आरती केली जाते.
संपूर्ण जागरण हे तीन ते चार तास चालते,
सर्वसाधारणपणे
घरामध्ये घडणा-या प्रत्येक शुभकार्याच्यावेळी जागरण गोंधळ करण्याची प्रथा प्रत्येक कुळामध्ये असते. याशिवाय प्रतिवार्षिक किंवा त्रैवार्षिक कुळधर्म कुलाचारावेळी जागरण गोंधळ घातला जातो.


लंगर

Placeholder Image

येळकोट नामाचा करिता गजर आनंद भक्ताच्या मनी दाटे.. 
करुनी कुळधर्म कुलाचार अवघ्या सात जन्माचे पाप घटे..
एका म्हणे तोडिता लंगर, कडी एक तुटे नी सहस्त्र विघ्न हटे..

लोकगीतामध्ये कुळधर्म कुलाचार आणि लंगर चे महत्व सांगितले आहे. जागरण गोंधळ झाल्यानंतर लंगर (लोखंडी साखळी) तोडण्याचा विधी होतो. यावेळी साखळीचे एक टोक खिळ्यामध्ये अडकविले जाते तर दुस-या बाजूचे टोक लंगर तोडणा-च्या हातात असते, 'सदानंदाचा येळकोट' च्या गजरात साखळीला हिसका देऊन कडी तोडली जाते. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यास कडी सहज तुटते आणि एक कडी तुटल्यानंतर हजार विघ्न हटतात इतके महत्व लंगर तोडण्याच्या विधीला आहे अशी भाविकांची श्रद्धा असते.


मल्हार वारी

Placeholder Imageमल्हार वारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर देवा, देवा मी जातो दुरून

इंद्र व सकल देवगण गंधर्वांनी, कैलासावर भगवान शंकरासमोर दैत्यांचा संहार करण्याची व त्यांचे निर्दालन करण्याची वारी मागितली. आणि कालांतराने युद्ध होऊन मल्लासुराचा संहार केला, देवता गणांनी मागितलेली वारी सफल संपूर्ण झाली. हिच प्रथा कलीयुगामध्ये मल्हार वारी नावाने रूढ आहे. जागरणाचे वेळी वाघ्या मुरुळी वारीचे गीत गाऊन वारी मागतात, त्यावेळी वाघ्या किंवा मुरुळी, भाविकांनी दिलेली वारी पदरामध्ये घेतात. आजही मल्हारभक्त रविवारी, सोमवती, चंपाषष्ठी सारख्या उत्सवामध्ये सात घरी वारी मागतात. याच्या मागची संकल्पना अशी आहे कि, श्रीखंडोबा मानवी रुपामध्ये येऊन संकट निवारणाची वारी देऊन जातात. म्हणून श्रीक्षेत्र जेजुरी येथे कुळधर्म कुलाचाराचे वेळी वारी मागण्याची प्रथा आजही रूढ आहे.
मल्हार वारीला मलूखानाची वारी असेही म्हणतात त्याला दंतकथेचा आधार दिला जातो तो असा, बादशाह औरंगझेब ने जेव्हा जेजुरगडावर स्वारी केली, तेव्हा मल्हारी मार्तंडाने अजामत (करामत) दाखविल्याने अजामतखान तसेच मलूखान नावाने जयजयकार करीत वारी मागितली. आजही मल्हारभक्त त्याप्रसंगाची आठवण म्हणून मलूखानाची वारी मागतात.

  • मल्हारीची वारी
  • खंडेरायाची वारी
  • मार्तंडाची वारी
  • सदानंदाची वारी
  • मलूखानाची वारी.

Bookmark and Share