Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

श्रीधर स्वामी नाझरेकर

आपल्या रसाळ सुमधूर, भावपूर्ण वाणीने आयुष्यभर वाङ्मय निर्मिती करणारे विख्यात कवी श्रीधर स्वामींचा जन्म नाझरेकर कुळात १६५८ च्या सुमारास झाला, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये पंढरपूरजवळील नाझरे हे त्यांचे गाव. या गावाची पिढीजात वतनदारी त्यांच्या पूर्वजांना मिळाली होती. नाझरे या गावातच प्रचीन ऋषीकूल परंपरेला साजेल असे त्यांचे शिक्षण झाले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत, भागवत, व्याकरण, ज्योतिष हे ग्रंथ तसेच नामदेव, तुकाराम, एकनाथ या संतांच्या साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला होता.. वडिलांसोबत पंढरपूरला आलेल्या श्रीधरस्वामींनी पुढे पंढरपूर हीच आपली कर्मभूमी समजली. इथेच त्यांनी अध्यापनाचे काम सुरू करून अफाट ग्रंथ निर्मिती केली. सव्वा लाख ओवींचे साहित्य लिहिणाऱ्या श्रीधर स्वामींच ग्रंथ रचनेचा आरंभ ‘हरिविजय’पासून सुरू होऊन सांगता क-हेपठारावरील बारामती क्षेत्री काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये रचलेल्या ‘शिवलीलामृता’ने झाली. यामध्ये, पंढरी माहात्म्य, व्यंकटेश माहात्म्य, वेदान्त सूर्य यावर संस्कृत स्तोत्रे, ‘रामविजय’, ‘पांडवप्रताप’ ही काव्यरचना. पांडुरंग, रुक्मिणी, राम, कृष्ण यांच्यावर अभंग तसेच आरती, स्तवने, पदे इ. प्रकारची रचना केली.
तसं पाहिलं तर श्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे वापरली त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात. ७ डिसेंबर १७३० ला त्यांचे निधन झाले.
संस्कृत मल्लारी महात्म्य सर्वसामान्यांना सहज सोपे वाटावे म्हणून दोन अध्यायामध्ये त्याची रचना केली.

श्रीमल्लारिमहात्म्य - अध्याय पहिला

मणिमल्लमर्दन जगदीश्वर । चिच्छक्तिमहालसाप्रियकर    ।
ब्रह्मानंद जगदाधार    ।   निर्विकार जगद्‌गुरु ॥ १ ॥
सायुज्यतुरंगीं विराजित । दिव्य ज्ञानखड्‍ग करीं झळकत ।
बोधत्रिशूळ प्रतापवंत । सद्‌विवेक सत्य डमरू तो ॥ २ ॥
निजामृतें भरलें पाणिपात्र । जो सुहास्यवदन शतपत्रनेत्र   ।
जो दुष्टदमन चारुगात्र । लीला विचित्र तयाची     ॥ ३ ॥
मुमुक्षु ज्ञानी चतुर पंडित । तयांप्रति श्रीधर विनवित ।
मणिमल्लमर्दन आमुचें कुळदैवत । तयांचे चरित परिसा आतां ॥ ४ ॥
जो अवतरला कैलासवासी । प्रतापार्क प्रेमपुरविलासी ।
सनत्कुमारादि महाऋषी । कथा दिननिशीं गाती ज्याची ॥ ५ ॥
तडिदंबरें तेजाळ झळकतीं । कीं उदया आला किशोरगभस्ती ।
तुहनगिरिनंदिनी भागीरथी । दोघी शोभती दोहींकडे ॥ ६ ॥
कलधौतप्रभेहून प्रबळ । उधळे भावहरिद्राचूर्ण तेजाळ ।
तिणें उर्वी आणि निराळ । आनंदमय शोभले ॥ ७ ॥
ब्रह्मांडपुराणीं नि:सीम । सत्यवतीह्रदयरत्नें उत्तम ।
कथिलें मणिमल्लमर्दनमाहात्मय । तें सप्रेम परिसिजे ॥ ८ ॥
कैलासशिखरीं अपर्णा । पुसती जाली भाळलोचना ।
जगद्‌वंद्या पंचवदना । पुरातना परमेश्वरा ! ॥ ९ ॥
क्षेत्रांत क्षेत्र कोणतें विशेष?' । यावरि बोले व्योमकेश ।
कृतयुगीं मनु ऋषिविशेष । परि बलहीन श्रीहीन जाला ॥ १० ॥
तो हिंडतां घोर कांतार । पूर्वपुण्यें भेटले सनत्कुमार ।
तिहीं त्याप्रति कथिलें हें चरित्र । सर्व ऎश्‍वर्य देणार जें ॥ ११ ॥
पूर्वीं धर्मपुत्र सत्यसुजाण । तपस्तेजें जेविं चंडकिरण ।
मणिचूळपर्वती राहून । तप दारुण आचरती ॥ १२ ॥
मणिचूळपर्वत शोभिवंत । नाना वृक्षीं विराजत ।
सदा सफळ गगनभेदित । माजीं आदित्यकिरण न दिसे ॥ १३ ॥
मलयागर कृष्णागर चंदन । सुवासें भरलें सर्व वन ।
जैसे सत्पुरुषाचे गुण । न सांगतां प्रकट होती ॥ १४ ॥
आम्रवृक्ष पाडा भाले । टपटपा टाकिती पक्वफळें ।
जैसे उदार मनींचे कोवळे । धनदानें वर्षती ॥ १५ ॥
मयोरें चातकें बदकें । कस्तुरीकुरंग जवादिबिडाळकें ।
खेळतीं, जैसे निजसुखें । विरक्तपुरुष विश्रांतिवनीं ॥ १६ ॥
राजहंस चातक कोकिळा । निजछंदें बोलती स्वलीला ।
तें वनींचें सुख पाहता डोळां । तटस्थ होती सुरनर ॥ १७ ॥
ऎसा तो मणिचूळ पर्वत । अग्निहोत्री महाराज पंडित ।
कुटुंबांसहित ऋषि समस्त । आश्रम करून तेथ असती ॥ १८ ॥
आंगीं उमटतां दिव्यज्ञान । प्राक्तनभोगें ये संसारविघ्न ।
तेंवि मणिमल्ल सेना घेऊन । मृगयामिसें तेथ आले ॥ १९ ॥
परमविक्राळ दैत्य दारुण । सुर-भूसुर-पीडक दुर्जन ।
विध्वंसित चालिले वन । गो-द्विज-हनन करिती बहु ॥ २० ॥
जैसें मर्कटीं केलें मद्यपान । भूतसंचार वरि वृश्‍चिकदंशन ।
मग ते पर्वतीं अन्योन्य । तेंवि दुर्जन दैत्य ते ॥ २१ ॥
कुंडवेदिका विध्वंसून । यज्ञपात्रें टाकिती जाळून ।
मांस मद्य आणून । भक्षून उच्छिष्ट विखरिती ॥ २२॥
मनुष्यप्रेतखंडें आणून । कुंडांत टाकिती प्रेत्नेंकरून ।
द्विज जाती आश्रम टाकून । त्यांस धरून बांधिती वृक्षीं ॥ २३ ॥
पतिव्रतांस बळेंचि धरिती । त्या तत्काळचि प्राण सोडिती ।
एकी दीर्घस्वरें हाका देती । पितापतिबंधुनामें ॥ २४ ॥
ब्रह्मचारी वनस्थ मस्करी । स्वस्थानें सांडून पळती दुरी ।
जैसा वोणवा पेटतां कांतारीं । अंडज जाती अन्यस्थळा ॥ २५ ॥
विप्रकन्या घेऊन सर्व । तेथून गेले दुष्ट दानव ।
तेणें दु:खें ते भूदेव । तळमळती, तें न वर्णवे ॥ २६ ॥
गिरिकंदरीं लपती विप्रोत्तम । म्हणाल, 'शापून केले कां न भस्म?'
तरी तप केलें जें नि:सीम । त्यास क्षय होईल कीं! ॥ २७ ॥
प्रजा पीडतां बहुत । उर्वीवरी जाला आकांत ।
दैत्यां भेणें समस्त । घोर कांतारीं विवरीं दडती ॥ २८ ॥
मग सर्व प्रजा ऋषि मिळोन । पाकशासनास गेले शरण ।
शक्रे सर्व विप्रांस नमून । आसनीं बैसवून पूजिलें ॥ २९ ॥
शोकें विव्हळ जाले ब्राह्मण । म्हणती,  'मणिमल्लीं पीडिलें दारुण' ।
वासवें समस्त ऎकून । म्हणे, 'दुर्जन माजले ॥ ३०॥
ब्रह्मवरें मत्त जालें । इहीं एक अंगुष्ठावरी तप केलें ।
हे मज नाटोपती वहिले । बहु प्रयत्न करितांही ॥ ३१ ॥
आतां वैकुंठ पुरविलासी । इंदिरावर क्षीराब्धिवासी ।
भक्तवत्सल ह्रषीकेशी त्यापाशी जाऊं चला' ॥ ३२॥
मग त्रिदशांसहित वासव । सवें प्रजा ऋषि घेऊन सर्व ।
वैकुंठपीठिंचा राव । जवळीं केला प्रेमभरें ॥ ३३ ॥
तें पाहतां वैकुंठनगर । अवघे चतुर्भुज पीतांबरधर ।
शंकचक्रादि चिन्हीं सुंदर । हरिरूप समान ते ॥ ३४ ॥
श्रीवत्सलांछनविरहित । विष्णुस्वरूप सर्व भक्त ।
सगुण सायुज्यता प्राप्त । बहुत जन्में तप करितां ॥ ३५ ॥
तेथ नाहीं द्वंद्वदु:ख। तेथ नाहींत कामक्रोधादिक ।
तेथिंचें ब्रह्मानंदसुख । अनुभविये जाणती ॥ ३६ ॥
जेथ निर्विकल्प वृक्षांचे वन । सुधारसाहून कोटिगुण ।
ते स्थळींचें गोड जीवन । ब्रह्मादिकां दुर्लभ तें ॥ ३७ ॥
क्षुधा तृषा मोह शोक पाहीं । इच्छा कल्पना भ्रांति सर्वही ।
यांची वार्ता तेथ नाहीं । वर्णूं काय एकमुखें ॥ ३८ ॥
असो, देव ऋषी प्रजानन । पावले तेव्हां वैकुंठभुवन ।
जयजयकार करून । लोटांगणें घालिती ॥ ३९ ॥
त्रिभुवन सौंदर्य एक होऊन । ओतलें हरिस्वरुप सगुण ।
कीं ब्रह्मानंदसुख संपूर्ण । श्रीमुखावरि रूपा आलें ॥ ४० ॥
घनश्याम पीतांबरधर । सच्चिदानंदतनु निर्विकार ।
जेथ नसती षड्‌विकार । षड्‍गुणैश्‍वर्यसंपन्न जो ॥ ४१ ॥
कर्तृत्व भोक्‍तृत्व नियंतृत्व । विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व ।
यश:श्रीकीर्तिऔदार्यमंडित । वैराग्य विज्ञान सर्व तेथ ॥ ४२ ॥
कोटिमनोजतात  भगवंत । अर्धांगी भार्गवी विराजत ।
सजळघनीं चपला झळकत । तैशी शोभत जगन्माता ॥ ४३ ॥
स्कंदतातभूषणशत्रु जाण । पुढें उभा सदा कर जोडून ।
पूर्व उत्तर मीमांसा वेद संपूर्ण । पक्षांतून ध्वनि गर्जती ॥ ४४ ॥
यालागीं छंदोगाम । तारक्षास बोलिजे नाम ।
ज्याचे स्वरूप वर्णिती निगम । चतुर्भुज हरिरूप तो ॥ ४५ ॥
चारी वेद बंदीजन विशेष । वर्णिती श्रीहरीचें निर्दोष यश ।
षट्‌शास्त्रें पुराणें अष्टादश । दूर उभीं कर जोडूनी ॥ ४६ ॥
इंद्र अग्नि यम नैऋत्य वरुण । वायु कुबेर ईशान ।
अष्टकोनी बद्धांजुळीपूर्ण । दिक्पाळ उभे असती ॥ ४७ ॥
ऎसा महिमा वर्णिता । कोटी वरुषें न सरे सर्वथा ।
श्रुतिस्मृतींचा खाले माथां । वर्णूं जाता जगदीश्वर ॥ ४८ ॥
निरभिमान होऊन । देव ऋषि करीत स्तवन ।
'हे इंदिरावर पद्मनयन । हे भक्तजनकुलिश-पंजर तूं ! ॥ ४९ ॥
हे मधुमुरनरककैटभभंजन । हे शंबररिपु हरमानसरंजन ।
हे, मंदरगिरिधर पीतवसन । ब्रह्मानंदा जगद्‌गुरो ! ॥ ५० ॥
हे गजमर्दन गजेंद्रोद्धारण । हे कमलोद्‌भवजनक जनार्दन ।
हे जगद्‍वंद्य जगरक्षण । यज्ञपाळण यज्ञपुरुषा ! ॥ ५१ ॥
हे दशावतारचरित्रचालका । हे मधुकैटभरिपो सर्वात्मका ।
हे अनंतशयन अनंतवेषधारका । आदिपुरुषा अभेदा!' ॥ ५२ ॥
ऎसें देवी स्तवन करून । सांगती, 'मणिमल्लांनीं गांजिलें दारूण' ।
यावरि जगद्‍गुरु सुहास्यवदन । बोलता जाला त्यांप्रती ॥ ५३ ॥
म्हणे, 'मममानससरोवरमराळ । जो कर्पूरगौर गोक्षीरधवळ ।
त्याच्या हातें ते परमखळ । मणिमल्ल संहारती' ॥ ५४ ॥
मग समस्तांस घेऊन श्रीकरधर । कैलासाप्रति चालिला मुरहर ।
तो मणिमयगिरिवर प्रभाकर । कोटि दिनकर प्रकटले जेवीं ॥ ५५ ॥
सकळ ज्योतिर्मय शिवसदन । मणिमय नग शुभ्र वर्ण ।
तैसा नंदिकेश्वर बळगहन । चंडकिरणप्रभेऎसा ॥ ५६ ॥
शुभ्रमंडप सिंहासन शुभ्र । वरि दैदीप्यमान कर्पूरगौर ।
मस्तकीं स्वर्धुनी सकुमारा । शुभ्रवर्ण झळकतसे ॥ ५७ ॥
शुभ्र जटा शुभ्र चंद्र भाळीं पूर्ण । कर्णीं शुभ्र कुंडलें दैदीप्यमान ।
शुभ्र विशाळ नेत्र आकर्ण । पंचवदन त्रिलोचन जो ॥ ५८ ॥
सर्वांगीं शुभ्र विभूति चर्चिली । पंच मुगुटांची प्रभा पडली ।
माळा शोभत शुद्ध श्‍वेतोत्पळीं । शुभ्र सुमनहार झळकती ॥ ५९ ॥
शुभ्र व्यालभूषणें झळकतीं । त्यांचे शिरीं शुभ्र मणि वोप देती ।
श्‍वेतगजचर्माची दीप्ती । शार्दूलचर्म शुभ्रचि तें ॥ ६० ॥
शुभ्र चिरें शुभ्रचामरें । वरि भक्त वारिती स्नेहादरें ।
हर हर शिवनामगजरें । दास गर्जती क्षणक्षणीं ॥ ६१ ॥
कमलोद्‌भवजनकसहोदरी । सजलजलदवर्ण सुंदरी ।
तुहिनधराधरप्रियपुत्री । वेदशास्त्रीं वर्णिली जे ॥ ६२ ॥
जिचिया अंगुष्ठावरुनि देखा । ओवाळाव्या अष्टनायिका ।
जिचें स्वरूप पाहतां कामांतका । धणी न पुरे सहसाही ॥ ६३ ॥
जिचिया मुखमृगांकावरून । ओवाळावे कोटि मीनकेतन ।
अंबुजसंभव पाकशासन । त्याचेनि स्वरूप ऎसें न करवे ॥ ६४ ॥
जे जगदंबा मुरहरभगिनी । ओतिली इंद्रनीळकीळ  गाळुनी ।
मृगमीनखंजन  लोचनांवरुनी । सांडणें करुनि  टाकावे ॥ ६५ ॥
दंततेज पडतां मेदिनीं । पाषाण होती महामणी ।
जिचा मुखमृगांक देखोनी । देवललना पाहती खाले ॥ ६६ ॥
असो, ऎसा शक्तीसह कैलासनायक । देखोनि सकळ वृंदारक ।
जोडुनियां निजहस्तक । स्तवन करिती प्रीतीनें ॥ ६७ ॥
'जय जय हरिचित्तसागरउल्हासचंद्रा । निजजनमानसचकोरआल्हादकरा ।
मायाचक्रचालका परमोदार । ब्रह्मानंदा जगद्‌गुरो ! ॥ ६८ ॥
अपर्णानयनाब्जविकासकभास्करा । षडास्यजनका यक्षपतिप्राणमित्रा ।
दक्षमखविध्वंसका त्रिनेत्रा । त्रिपुरांतका त्रिदोषशमना ! ॥ ६९ ॥
भक्तवरदा वृषभध्वजा । दाक्षायणीवल्लभा जय दशभुजा ।
खट्‌वांगपाणि बलितनुजा  । प्रियवरदायका जगद्‌गुरो ! ॥ ७० ॥
काकोळभक्षका गंगाधरा । वामदेवा ईशान्येश्‍वरा ।
शफरीध्वजशिक्षाकरा । परात्परा परमात्मया !' ॥ ७१ ॥
ऎकोन संतोषला त्रिनयन । वैकुंठपतीस सन्मुख देखून ।
प्रेमपडिभरें देत आलिंगन । अनुक्रमें समस्तांसी ॥ ७२ ॥
'मणिमल्लें गांजिलें बहुत' । सुरभूसुर गार्‍हाणें सांगत ।
 'मणिपर्वतशिखरीं राहत । नाटोपती' त्रिभुवना ॥ ७३ ॥
त्यांस भेऊन शक्र नित्यनूतनें । पाठवितो पारिजातसुमनें ।
तिहीं अग्निहोत्रें केलीं विच्छिन्नें । विटंबना न वर्णवे ते ॥ ७४ ॥
त्यांस जाळूं न सके अग्नी । दिक्पाळ सेवेस लाविले सदनीं ।
कुंभिनीवसन पाणि जोडुनी । इच्छिलीं आणुनी रत्‍नें देत ॥ ७५ ॥
ऋषिप्रजा करिती रुदन । स्त्रिया भ्रष्टविल्या स्वामी नेऊन' ।
ऎसें ऎकतां पंचानन । कल्पांत हाक फोडित ॥ ७६ ॥
सत्राणें जटाभार आफळी । अकस्मात् त्यांतून कृत्या निघाली ।
विशाळवदना चाटी आवळी । वाटे कमळभवांड ग्रासिलें ॥ ७७ ॥
तिचें भयानक रूप देखोन । भयाभीत जालें त्रिभुवन ।
ऋषींनीं तीवरि घृत शिंपून । घृतमारी नाम ठेविलें ॥ ७८ ॥
काळरूपिणी खेचरी । हाकें तिचे ब्रह्मांड थरारी ।
उभा ठाकला त्रिपुरारि । मार्तंडरूप धरी तेव्हां ॥ ७९ ॥
नंदी जाहला तुरंग । त्यावरि आरूढला उमारंग ।
गगनभेरी ठोकितां स्वर्ग । नादें डळमळूं लागलें ॥ ८० ॥
रणतुरें खांकती एकसरी । दैत्यां आंगीं उमटली शारी ।
देवसेना ते अवसरीं । स्वर्गपंथें उतरत ॥ ८१ ॥
सवें निघाले साठि कोटि गण । चौसष्टि कोटि चामुंडा दारुण ।
औटकोटि भुतावळी संपूर्ण । नवकोटि कात्यायनी ॥ ८२ ॥
वेताळ चालिले असंख्यात । अष्टभैरव पुढें धांवत ।
एकादशरुद्र अद्‍भुत । भयानक निघाले ॥ ८३ ॥
तुरंगारूढ महाराज मार्तंड । सवें सात शत सारमेय प्रचंड ।
भयानक रूपें वितंड । सिंहशार्दूलासमान ॥ ८४ ॥
पूर्वदिशेचा राव तेव्हां । ऎरावतारूढ चाले मघवा ॥
मेषारूढ प्रचंड बरवा । सप्तपाणि मिरवतसे ॥ ८५ ॥
म्हैसारूढ तेव्हां पहा तो । दक्षणापती आला श्राद्धदेवो ।
नरारूढ नैऋत्यरावो । शिवासंमुख शोभतसे ॥ ८६ ॥
आपल्या भारेंसी रसाधिपती । मकरारूढ येत शीघ्रगती ।
लोकप्राणेश निश्‍चितीं । मृगारूढ धावतसे ॥ ८७ ॥
पुष्पकारूढ यक्षनायक जाण । वृषभारूढ येत ईशान ।
आपुलालीं शस्त्रें सांवरून । दळासहित पातले ॥ ८८ ॥
सवें निघाल्या पर्वतपंक्ती । तैसे चालिले चौदंत हस्ती ।
सप्त द्वीपींचे तुरंग धावती । पक्ष झळकती तयांचे ॥ ८९ ॥
जळराशीवरी जहाजें तळपतीं । तैसे स्यंदन वेगें धावती ।
नवग्रहांत श्रेष्ठ गभस्ती । तेंवि महीपति मुख्य शिव ॥ ९० ॥
ज्या तुरंगीं शिव बैसला । वाटे चंद्रकिरणें आटून घडिला ।
क्षीरसागरें पाठविला । ह्रदयशाळेमधूनी ॥ ९१ ॥
उच्चै:श्रव्याचा बंधु कनिष्ठ । कीं नवनीताचा घडिला सुभट ।
पुच्छवाल अयाल अवीट । महारजत प्रभेसमान ॥ ९२ ॥
विद्रुमप्रभेहून विशेष । चारी खूर त्याचे राजस ।
विशाळनेत्र, मनपवनास । सहज चालतां टाकी मागें ॥ ९३ ॥
जान्हवीजीवनें नित्य धूतला । सुधारसपानें पुष्ट जाला ।
ऎसिया ह्यावरी बैसला । हयपती नाम म्हणवूनी ॥ ९४ ॥
ऎसा हयारूढ मार्तंड । हातीं खांडा झळके प्रचंड ।
भार चालतां कमळभवांड । डळमळूं लागलें तेधवां ॥ ९५ ॥
साठि कोटि गणांसहित । रथारूढ गणपती निघत ।
मयूरारूढ षण्मुख विराजित । सेनानाथ स्वर्गींचा तो ॥ ९६ ॥
निजभारेंसी चालिला वीरभद्र । दैदीप्यमान जेंवि प्रलयरुद्र ।
वाटे वडवाग्नी आणि द्वादशमित्र । एकत्र करूनि घडियेला ॥ ९७ ॥
सर्वांत शिवतेज परमाद्‍भुत । वाटे तेजावरती पडिले शशि आदित्य ।
धाकें आकाश असुडत । सडा होत भगणाचा ॥ ९८ ॥
शुष्कतुंबिनीफळ जळीं । तेंवि कुंभिनीतळ डळमळी ।
चतुर्दशलोकीं हाक गाजली । चपळा पडती कडकडुनी ॥ ९९ ॥
मणिमल्लगृहीं अपशकुन देख । शोणितवर्षाव करी बलाहक ।
महाद्वारीं एकाएक । उर्वी उलली तेधवां ॥ १०० ॥
दैत्यांच्या आकर्षिल्या शक्ती । दिवाभीतें दिवा बोभाती ।
असो, एकवीस पद्में गणती । मार्तंडदळ मिळालें  ॥ १०१ ॥
वारणचक्र असंभाव्य । त्यावरी एकला लोटे कंठीरव ।
तेंवि नंदिकेश्‍वरें घेतली धाव । विनायक जैसा अहीवरी ॥ १०२ ॥
तों मणिपर्वतशिखरींहुनी । सेवकीं देखिली शिववाहिनी ।
मग मणिमल्लाप्रति जाऊनी । जाणविती समाचार ॥ १०३ ॥
मणिमल्ल पाहती वरून । म्हणत, 'भिकारी हा पंचवदन ।
पतंग प्रलयाग्नीस लक्षून । तैसा येत अम्हांवरी ॥ १०४ ॥
अपवित्र परम नरमुंडमाळा । गळां घाली, न ये कंटाळा ।
वोलें करिचर्म पांघुरला । चिताभस्म सर्वांगी' ॥ १०५ ॥
ऎसी निंदा करून । क्रोधा चढिले दोघे जण ।
दैत्यसेना घेऊन । बाहीर निघते जाहले ॥ १०६ ॥
मदोत्कट नाम दैत्य थोर । भट नाम देवशैल्य असुर ।
सौरभ्य सुरग्रासक अपार । दळासमवेत निघाले ॥ १०७ ॥
केयूर कवच सदामद । गौरमुख धूम्रवक्त्र सिंधुनाद ।
दीर्घजिव्हा खरानन सिंहशब्द । हलदंत वक्रदंत ॥ १०८ ॥
द्विशिर त्रिशिर त्रिपाद । एक अष्टचरण चतुष्पाद ।
अश्‍वमुखें  अगाध । प्रताप ज्यांचा अद्‍भुत हो! ॥ १०९ ॥
गजस्कंधीं बैसला मणी । मल्ल आरूढला  दिव्यस्यंदनी ।
पर्वतांचे कडे खचती धरणी । वाद्यनादें तयांच्या ॥ ११० ॥
सप्तकोटि अंगल गगन । मल्लारिदेवा वेष्टित जाण ।
शातकुंभप्रभेसमान । हरिद्राचूर्ण उधळतसे ॥ १११ ॥
असो, दोन्ही सैन्यें मिसळलीं । संग्रामाचीं झूज लागली ।
बाणांची वाकडी बैसली । अखंड धारा खंडेना ॥ ११२ ॥
लोहार्गळा घेऊनि असुर । करिती देवदळाचा संहार ।
शिरें छेदून अपवित्र । रक्तपान करिती बळें ॥ ११३ ॥
दैत्यकबंधे शिरें नसतां । धावतीं घेऊन असिलता ।
देवचमूचा तत्त्वतां । संहार करिती सक्रोधें ॥ ११४ ॥
लवण पाहोन सवेगा । धावती रुधिराच्या निम्नगा ।
तें देखोन उमारंगा । न सांवरे क्रोधाग्नी ॥ ११५ ॥
भ्रूसंकेत दावी कल्पांतरुद्र । तों उठावले देवांचे भार ।
तृणपर्वत जाळी वैश्‍वानर । तैसे निर्जत धावती ॥ ११६ ॥
मार्तंड कृपादृष्टीनें पाहत । देवांचीं प्रेतें उठतीं अकस्मात ।
जो इच्छामात्रें ब्रह्मांड घडित । त्यास अशक्य काय असे? ॥ ११७ ॥
खड्‌ग दंष्ट्री दैत्य अद्‌भुत । मणिमल्लासी बोले शपथ ।
'स्मशानवासी हा अकस्मात । धरून आणिन पाहें आतां' ॥ ११८ ॥
सवें पांच लक्ष गजभार । चाळीस लक्ष रहंवर ।
घेऊन चालिला असुर । मल्लारीवरि अभिमानें ॥ ११९ ॥
ऎसें देखोन कैलासनाथ । स्कंदाप्रती दावी भ्रूसंकेत ।
उद्यानीं चपळ पडे अकस्मात । तेंवि धावला मयूरवहन ॥ १२० ॥
खड्‌गदंष्ट्री बोले वचन । 'अरे, तूं शिवबाळक करी रक्तपान ।
तुवां तारकासुर मारिला कपटेंकरून । तें मजसीं न चले एथें!' ॥ १२१ ॥
स्वामी म्हणे, 'शतमूर्खा । ऎक वज्रदंष्ट्री मश्यका ।
मी शिवबाल, परि देखा । काळ तुझा निर्धारें ॥ १२२ ॥
तुझिया गर्वाचें कवच पूर्ण । समरीं आतां करीण चूर्ण ।
मी षडानन तुझे पंचप्राण । मुक्त करीन शरीरांतुनि!' ॥ १२३ ॥
ऎसें बोलोन तारकारि । सहस्त्र बाण घातले त्यावरी ।
सपक्ष बुडाले शरीरीं । परि असुर डळमळीना ॥ १२४ ॥
दैत्यें सोडिले लक्षशर । ते खड्‌गे तोडी शिवकुमर ।
मग नाना शस्त्रांचे मार । परस्परें करिते जाले ॥ १२५ ॥
बाण बाणासी संघटती । वन्हिवृष्टि होत क्षितीं ।
दोन्ही दळें तटस्थ पहाती । युद्ध दोघांचें अनिवार ॥ १२६ ॥
स्वामी कार्तिक अनिवार । क्षोभला जैला प्रळयरुद्र ।
मस्तकीं झळकती साही कोटीर । अंगीं अलंकार विद्युत्प्राय ॥ १२७ ॥
द्वादश हस्तांचे संधान । साही चापें ओढी षडानन ।
आलातचक्रवत् भ्रमती जाण । किंवा चक्रे क्षणप्रभेचीं ॥ १२८ ॥
दैत्य गगनपंथे जाऊन । शिवदळावरी वर्षे मार्गण ।
त्याहून उंच उडाला मयूरवहन । सोडी बाण दैत्यावरी ॥ १२९ ॥
सवेंचि भूमंडळीं येती । मागुती गगनीं गुप्त होती ।
जैसे कुहूचे दोषेमाजी न दिसती । सीतकर उष्णकर ॥ १३० ॥
सवेंच प्रगटले दळाभीतरीं । मग कुमारें शक्ति काढिली झडकरी ।
शतघंटा महामारी । स्थळीं स्थळीं बांधिल्या जीतें ॥ १३१ ॥
उगवले सहस्त्र सूर्य अखंड । तैसी शक्ति काढिली प्रचंड ।
कीं उभारला काळदंड । संहारावया जगातें ॥ १३२ ॥
प्रळायाग्नीची शिखा सबळ । कीं कृतांतजिव्हा तेजाळ ।
स्वामीनें सोडिली तत्काळ । खड्‌गदंष्ट्रीवरी क्रोधें ॥ १३३ ॥
त्रुटी न वाजतां ते क्षणीं । दैत्याचें ह्रुदय फोडुनी ।
पंचप्राण गेली घेउनी गगनपंथें तेधवां ॥ १३४ ॥
दैत्यदळीं हाहाकार । मग उल्कामुख आला असुर ।
वीस लक्ष सवें रहंवर । रथ कुंजर दश लक्ष ॥ १३५ ॥
त्यावरि उठिला गजानन । जेंवि शुष्ककाननीं प्रवेशे अग्न ।
दैत्य म्हणे, 'तुवां मोदक भक्षून । सुखें रहावें होतें घरीं ॥ १३६ ॥
तूं लंबोदर जड बहुत । कैसा तगसील युद्धाआंत ।
तुवां करुनियां नृत्य । शिवगौरी संतोषवावे' ॥ १३७ ॥
गणाधीश बोले वचन । 'तुझा शिरच्छेद करून ।
तोषवीन एथें अपर्णारमण । पाहें क्षण न लगतां! ॥ १३८ ॥
स्यंदनारूढ गणपती । सोडी असंख्य बाणपंक्ती ।
जैशा विद्युल्लता लवती । एकामागें एक वेगें ॥ १३९ ॥
शिरांच्या लाखोल्या बहुत । भूलिंगास गणपती समर्पित ।
करचरण असंख्यात । पाडिले, गणित करी कोण? ॥ १४० ॥
दैत्यकबंधें उठोनी । टाळिया वाजत नाचती रणीं ।
शिरें हांसतीं गगनीं । मुक्त जालीं म्हणॊनियां ॥ १४१ ॥
दैत्यें टाकिली गदा सबळ । ते गणेशें फोडिली तत्काळ ।
मग गणपतीचा स्यंदन चपळ । दैत्यें छेदिला अंख त्याचा ॥ १४२ ॥
दैत्याचाही सबळ रथ । चूर्ण करी गणनाथ ।
मग चरणचाली दोघे चमकत । समरभूमीस तेधवां ॥ १४३ ॥
दैत्यें टाकिली दारुण शक्ती । ते दंताखालें घालीत गणपती ।
यवपिष्टवत् करूनि क्षितीं । टाकिली क्रोधें तेधवां ॥ १४४ ॥
मग दैत्यसेनेंत गजानन । शुंडादंडें दैत्य धरून ।
कोट्यवधी केलें चूर्ण । दाढेखालीं दाटुनी ॥ १४५ ॥
पळतां पायीं गज धरुनी । असंख्य आपटिले रणमेदिनीं ।
रथ भिरकाविले गगनीं । संख्या गणी कवणातें ॥ १४६ ॥
अश्‍वांसहित स्वार । आपटुनियां केले चूर ।
विद्युत्प्राय शिवकुमर । दैत्यसेनेंत तळपतसे ॥ १४७ ॥
दैत्य धरून बलागळें । दाढेखालीं गणेशें रगडिले ।
पळॊं लागलीं असुरदळें । हाहाकार जहाला ॥ १४८ ॥
अनिवार गजवदनाचा भार । साहों न सकती कदा असुर ।
प्रळयकाळ वर्तला थोर । धन्य वीर गजानन ॥ १४९ ॥
विधि हरि हर शचीपती । तर्जनी मस्तक डोलविती ।
यावरी उल्कामुख पापमती । सिंहवदन जहाला ॥ १५० ॥
हाक देऊन झडकरीं। वेगें आला गणपतीवरी ।
युद्ध जहालें घटका चारी । न ये हारी दैत्य कदा ॥ १५१ ॥
मह शुंडादंडें धरून । मुखीं घालून केला चूर्ण ।
पुष्पें वर्षती सुरगण । शोक दारुण दैत्यदळीं ॥ १५२ ॥
मार्तंडे ह्रदयीं धरून । आलिंगिला वारणानन ।
यावरि कोटिकुंजर दैत्य जाण । युद्धास पुढें पातला ॥ १५३ ॥
त्यावरि नंदिकेश्वर । उठावला परम भयंकर ।
शिवरूप धरून साचार । रथावरी बैसला ॥ १५४ ॥
कुंतलोमा नाम दैत्य । नंदीस म्हणे, 'तूं पशु सत्य ।
तुवां भक्षावें गवत । तुज युद्ध कायसें?' ॥ १५५ ॥
यावरि बोले गायत्रीनंदन । 'आतां दैत्यवन आवघेंच भक्षिन!' ।
मग एक यामपर्यंत जाण । युद्ध केलें नंदीनें ॥ १५६ ॥
कुंतलोमा कोटिकुंजर दोघे जण । नंदीनें खड्‍गघायेंकरून ।
घेतला दोघांचा प्राण । गर्जती सुरगण आनंदें ॥ १५७ ॥
यावरि मणिमल्ल दोघे जण । क्रोधावले जैसे प्रलयाग्न ।
म्हणती, 'शिवसेना जाळून । टाकूं आतां क्षणार्धे!' ॥ १५८ ॥
मल्लाप्रती म्हणे मणी । 'माझें युद्ध पाहें समरांगणीं' ।
मणीसिंहनादें मेदिनी । थरारिली अतिभयें ॥ १५९ ॥
मेरुमंदार डळमळी । सिद्धांचीं आसनें चळलीं ।
नवही खंडें गजबजलीं । सप्तही द्वीपें थरथरित ॥ १६० ॥
सप्तसमुद्र उचंबळत । छप्पन्न देश चळीं कांपत ।
सप्तपाताळें दणाणित । हाकेसरसी तयाच्या ॥ १६१ ॥
विशाळ शरीर त्याचें पूर्ण । किंवा आकाशास दिधलें टेंकण ।
वीस भुजा मणीलागून । सायकासनें दशहस्तीं ॥ १६२ ॥
जांबुनद सुवर्ण तप्त । त्याचे अलंकार झळकत ।
रक्तचंदन उटी विराजत । आरक्त हार जपापुष्पें ॥ १६३ ॥
जैसे महाविजांचे उमाळे । तेंवि अलंकार आंगीं मिरवले ।
मुगुटतेज प्रकाशलें । धरणीवरी असंभाव्य ॥ १६४ ॥
ऎसा समरांगणा आला मणि । वैभव दावी शिवालागुनी ।
तेंवि सिंहासन्मुख इभ माजूनी । मुक्त दावी मस्तकींचें ॥ १६५ ॥
खद्योत आपले तेजें जाणा । जिंकीन म्हणें चंडकिरणा ।
मार्जार माजोन समरांगणा । आला जैसा व्याघ्रापुढें ॥ १६६ ॥
तुरंगारूढ जगदात्मा शिव । हांसे देखोनि त्याचें वैभव ।
कीं असंख्य दीपिकांचे उजाळ सर्व । उष्णकर नाणी दृष्टीतें ॥ १६७ ॥
गर्वे शिवाप्रती बोले मणी । 'तूं भीक मागोनी रहावें स्मशानीं ।
तूं भस्मासुरापुढें पळोनी । गेलासी, मी हें जाणतों!' ॥ १६८ ॥
शिव म्हणे, 'मस्यका मणी! । तुझें शिर आजि उडवीन रणीं ।
तूं यमपुरीस जाऊनी । स्थळपाहें बंधूस तुझ्या ॥ १६९ ॥
तूं मरण पावल्या पाठीं । मल्लास पाठवितों उठाउठीं ।
तुवां गोब्राह्मणा पीडिलें सृष्टीं । पाहें कौतुक आतां !' ॥ १७० ॥
विजयश्रीमंडित खंडेरायें । हाकें गर्जविलें  भुवनत्रय ।
चंड गदा लवलाहें । प्रथम प्रेरिली मणीवरी ॥ १७१ ॥
ते मणीचे ह्रदयीं आदळत । गदगदां दैत्येंद्र हांसत ।
'तुझें बळकटपण कळलें सत्य । गदा पुष्पवत्  मज वाटे!' ॥ १७२ ॥
यावरि शरसंधानीं उमावल्लभ । संहारीत दैत्यांचे कदंब ।
जैसे प्रलयाग्नीमाजीं शलभ । चक्र सांपडलें एकदाचि ॥ १७३ ॥
मणींने सहस्त्र शर ते वेळां । वेगें सोडिले जेंवि चपळा ।
जगदीश्‍वरें हुंकार दिल्हा । भस्म केले शर सर्व ॥ १७४ ॥
वृक्षाग्रीचीं फळें लक्षुनी । श्येनपक्षी धावती बळेंकरूनी ।
तैसीं दैत्यशिरें उडवुनी ।  बाण नेती गगनांत ॥ १७५ ॥
जैशा मेघधारा अपार । तैसे सुटती असंख्य शर ।
दैत्य रणीं खिळिले समग्र । मयोरा ऎसे दिसती हो! ॥ १७६ ॥
एक शर सोडी मणिदर्पहरण । त्यापासाव निघती मार्गण ।
जैसी मूळ प्रकृतीपासून । असंख्य जीवसृष्टी उद्‌भवे ॥ १७७ ॥
कीं एकुलता एक पुत्र । संतती वाढे त्याची अपार ।
कीं शब्दमाला साचार । निघती पंडितमुखांतुनी ॥ १७८ ॥
ऎसें संहारतां दळ । मणीहि सोडी बाणजाळ ।
जैसा महाचतुरापुढें प्रबळ । मूर्ख दावी शब्दरचना ॥ १७९ ॥
यावरी मणीचा मुगुट तेजाळ पूर्ण । शिवें फोडिला सोडून बाण ।
सर्षपप्राय कुटके करून । आकाशपंथें उडविला ॥ १८० ॥
क्रोधायमान खवळला मणी । शरभरूप धरी ते क्षणीं ।
उमावल्लभाचे आंगीं जाउनी । दंशिता जाला सक्रोधें ॥ १८१ ॥
महीपतीनें शक्ति घेतली । दैत्यावरी बळें प्रेरिली ।
दैत्यें धरून सगळी । चावून गिळिली क्षणार्धे ॥ १८२ ॥
दोघे एकांगवीर अनिवार । होत युद्धाचें घनचक्र ।
देव वाद्यें वाजविती अपार । रणश्रीवर्धन परम जीं ॥ १८३ ॥
हरिद्राचूर्ण उधळे अपार । तेणें पीतवर्ण जालें अंबर ।
कुरंगधर आणि दिनकर । गेले लपोन त्यामाजीं ॥ १८४ ॥
सर्परूप धरून मणी । दंश करी देवसेनेंत रिघोनी ।
सवेंच अश्‍वरूप धरूनी । सव्यापसव्य उदाळत ॥ १८५ ॥
मुखखुरघायें सकट । देवसेना केली पिष्ट ।
सवेंच गजरूप धरून सुभट । मारीत उठे निर्जरां ॥ १८६ ॥
गगनपंथें भिरकावी रथ । अश्‍व पायीं धरूनि आपटित ।
दशदिशांनीं देव पळत । थोर आकांत वर्षला ॥ १८७ ॥
जीं जीं रूपें मणी धरित । असिलताघायें अकस्मात ।
महीपती तत्काळ छेदित । आणिक धरीत तनु नूतन तो ॥ १८८ ॥
म्हैसासुर जाला मणी । शिवें तोही छेदिला रणीं ।
मागुती मुख्य रूप धरुनी । चौताळला शिवावरी ॥ १८९ ॥
देव म्हणती, 'दयाळा महीपती ! यावरि देईं यास मुक्ती !' ।
त्यावरी जगदीश्‍वरें ख्याती । केली तेव्हां ऎका ते ॥ १९० ॥
तुरंगारूढ भगवान । मन-पवन-गरुडास मागें टाकून ।
असिलता करीं घेऊन । नि:सीमवेगें धावला ॥ १९१ ॥
वज्रें भंगिजे शैलशिखर । तैसें उडविलें मणीचें शिर ।
पायांखाले घालूनि सत्वर । चूर्ण केलें रगडुनी ॥ १९२ ॥
जाला एकचि जयजयकार । उधळिती प्रतापभंडार ।
मणि पावोन दिव्यशरीर । विमानारूढ जाहला ॥ १९३ ॥
मणी स्तवन करीत ते क्षणीं । 'जय पंचवदना शूलपाणी! ।
मी धन्य जालों रे ! या मेदिनीं । तुझ्या हस्तें जगदात्मया! ॥ १९४ ॥
घडले पापाचे पर्वत । गो-द्विज पीडिले बहुत ।
ते दोष जळाले समस्त । पुण्यवंत मी जहालों ॥ १९५ ॥
माझें तुझें युद्ध जालें परम । जे वर्णिती भक्तसत्तम ।
आयुष्य आरोग्य श्री उत्तम । देईं त्यासी जगन्नाथा ! ॥ १९६ ॥
तुझें माहात्म्य गाती ऎकती । त्यांस यशस्वी करीं महीपती!' ।
ऎसें बोलोन, कैलासाप्रती । मणी गेला ऊर्ध्वपंथे ॥ १९७ ॥
ब्रह्मानंदे म्हणे श्रीधर । पुढें वीररस माजेल अपार ।
शिष्टाईस येईल सुरवर । इंदिरावर जगदात्मा ॥ १९८ ॥
ते कथा अति सुढाळ । ऎकोत निजभक्त प्रेमळ ।
ब्रह्मानंदस्वामी दयाळ । मणिमल्ल मर्दिले तेणेंचि ॥ १९९ ॥
॥इति श्रीब्रह्माण्डेपुराणे क्षेत्रखंडे मल्लारिमाहात्म्ये प्रथमोऽध्याय: ॥

श्रीमल्लारिमहात्म्य - अध्याय दुसरा

चतुर पंडित भाविक प्रेमळ । पुढें चरित्र ऎका रसाळ ।
जें ऎकतां कळिकाळ । विघ्वजाळ बांधीना ॥ १ ॥
यावरी मणिप्राणहरण । इंदिरावराप्रती  बोले वचन 'जगद्‍वंद्या!
तुवां तेथ जाऊन । मल्लाप्रती प्रबोधावें ॥ २ ॥
नीति सांगोन घननीला । त्याप्रती धाडावें पाताळा ।
नायके, तरी त्या कुटिला । संहारीन सर्वस्वें! ॥ ३ ॥
ऎसें वचन ऎकतां श्रीरंग । सुपर्णारूढ जाला भक्तभवभंग ।
जो घनश्यामवर्ण कोमळांग। वेदशास्त्रें वर्णिती जया ॥ ४ ॥
कमलदलाक्ष कमलावर । मल्लमंदिरा आला मुरहर ।
दैत्येंद्र उठोनी सत्वर । सामोरा आला बाहेरी ॥ ५ ॥
घालुनियां श्रेष्ठासन । मल्लें पूजिला जगज्जीवन ।
सर्वोपचार समर्पून । म्हणे, 'धन्य आजी जालों ! ॥ ६ ॥
महाराज तूं जगद्‌वंद्य । माझा पूर्वज जो प्रल्हाद ।
तेणें अर्चिलासि तूं मुकुंद । मजही पूज्य त्याकरितां!' ॥ ७ ॥
हरि म्हणे, 'कैलासानाथ । वेदशास्त्रां वंद्य समर्थ ।
ज्याचे आज्ञेनें यथार्थ । ब्रह्मांड केलें कमलोद्‍भवें ॥ ८ ॥
शिवशक्त्यात्मक सर्व जण । हें तूं जाणसी पूर्ण ज्ञान ।
जो दक्षमखविध्वंसक जाण । पुरातन पंचमुकुट तो ॥ ९ ॥
जो कामरहित कामांतक । गजासुरमर्दक  गजास्यजनक ।
जो दक्षमखविध्वंसक । अंधकासुरप्राणहरण ॥ १० ॥
हिमनगजामात काकोळधर । महास्मशानवासी जो अगोचर ।
भक्तसंतापनाशक मम प्राणमित्र । त्यासी मैत्रिकी करीं तूं ॥ ११ ॥
भूताधिपति विश्‍वेश्‍वर । मायाचक्रचालक महत्पापहर ।
त्रिगुणातीत त्रिनेत्र । तरि तो मित्र करीं तूं ॥ १२ ॥
संसारा आला जो पुरुष । जोडावें लोकीं निर्दोष यश ।
तरी सर्वभावें व्योमकेश । सखा करुनि नांदे सुखें ॥ १३ ॥
जो भोळा चक्रवर्ती दिगंबर । आपलें सर्व भक्तांस देणार ।
तरि तो अर्धनारीनटॆश्‍वर । सखा करूनि नांदे सुखें ॥ १४ ॥
शिव दयाळ कारुण्यसमुद्र । कोपलिया विश्‍व जाळील समग्र ।
तरि तो हिमनगजामात  कर्पूरगौर । सखा करूनी नांदे सुखें ॥ १५ ॥
हे गोष्टी तुज न माने जरी । पाताळीं नांदे तूं राज्य करीं ।
गो-ब्राह्मण उर्वीवरी । पीडून कष्टी करूं नको!' ॥ १६ ॥
ऎसें ऎकोन मल्लवीर । नेत्र केले जेंवि खदिरांगार ।
श्‍मश्रु पिळूनि सत्वर । म्हणे, ऎके श्रीवरा ! ॥ १७ ॥
मणी मारूनि आटिली वाहिनी । महावीर माझे ग्रासिले रणीं ।
त्यासी मैत्रिकी रथांगपाणी ! । करी म्हणसी कैसा तूं? ॥ १८ ॥
मी कोपलिया मल्लवीर । पडत्या आकाशास देईन धीर ।
आचमन करून सप्तसमुद्र । उदरामाजीं सांठवीन ॥ १९ ॥
चतुर्दश लोकांचे घेईन प्राण । स्वर्ग कैलास क्षणें जाळीन ।
दिग्गजांचे दंत मोडून । पृथ्वी नेईन रसातळा ॥ २० ॥
ग्रहगण सर्व नक्षत्रें । मोटॆंत बांधीन क्षणमात्रें ।
परम तेजाळ माझीं शस्त्रें । खंडण करितील वायूचें ॥ २१ ॥
हरि!   मी प्रल्हादकुळीं उत्पन्न । तरि तूं पहा माझें युद्धकदन ।
मी त्यास कदा न वजाय शरण । साम न करीं मुरारी! ॥ २२ ॥
पूर्वीं प्रल्हादें सहस्त्रनयन । जिंकिला समरीं युद्ध करून ।
कालाचे हस्तींचा हिरोन । दंड घेतला पुरुषार्थें ॥ २३ ॥
त्याचे कुळीं मी मल्लवीर । करीन त्या शिवाचा संहार ।
सैन्य गिळीन मी समग्र । वैकुंठपती । पाहें कां ॥ २४ ॥
तूं माझ्या पूर्वजीं पूजिलासी । म्हणवून तुज राखितों ह्रषीकेशी !
नाहीं तरी तुज गिळावयासी । उशीर मज कायसा? ॥ २५ ॥
मणिपर्वतीं उभा राहोन क्षणभरी । माझा संग्राम पाहें मधुकैटभारी ।
शिवाचें उदर फाडून झडकरी । गिळिला बंधु शोधीन ॥ २६ ॥
माझीं शस्त्रें तृषित समग्र । शोषूं भावितीं शिवाचें रुधिर ।
सुरसैन्य जाळीन सत्वर । पाहें आतां पद्मनाभा !' ॥ २७ ॥
हरि म्हणे, 'ऎक माझें वचन । तूं सोडीं गर्व अभिमान ।
महीपतीप्रति जाई शरण । अक्षय कल्याण होय तेणें ॥ २८ ॥
बंधुशोकाचें ज्वाळ । तेणें आहाळले तुझें ह्रदयकमळ ।
ढाळहीन मनमुक्ताफळ । जालें तुझें मल्लवीरा! ॥ २९ ॥
जेणें होय अनर्थ पूर्ण । तेथ चतुरें न घालाचें मन ।
उत्तम सन्मार्ग टाकून । आडमार्गा न वजावें!' ॥ ३० ॥
मल्ल म्हणे, 'ऎक श्रीपति । पश्‍चिमेस उगवेल गभस्ती ।
मृगजळीं बुडेल अगस्ती । तरि मी मैत्री न करीं कदा!' ॥ ३१ ॥
ऎसें बोलोन मल्लवीर । उभा ठाकला महासुर ।
सूर्यरथासी कोटीर । झगटला जाऊन तेधवा ॥ ३२ ॥
समुद्रांत करितां स्नान । नाभीपर्यंत त्यासी जीवन ।
कीं आकाशमंडपास जाण । स्तंभ दिधला दिसतसे ॥ ३३ ॥
मंदरगिरी जैसा प्रचंड । तैसे सरळ त्याचे दोर्दंड ।
खदिरांगापर्वत चंड । तैसे नेत्र तयाचे ॥ ३४ ॥
मल्ल चालता धरणीवरी । लवत भारें सकळ धरित्री ।
सिंदूरवर्ण जटा शिरीं । चर्चिला भाळीं रक्तचंदन ॥ ३५ ॥
छत्रचामर मित्रपत्रें शोभती । मकरबिरुदें पुढें चालतीं ।
अपार रणतुरें खाकातीं । दिग्गज कांपती ऎकतां  ॥ ३६ ॥
चौदंत हस्ती चौताळती । कीं पायांचे पर्वत धावती ।
हिरे पांचा जडिल्या दातीं । दशकोटी निघती कुंजर ॥ ३७ ॥
सुपर्णासमान वेगाडे । धावती पक्षांचे चपळ घोडे ।
रणसागरींचीं जहाजें प्रचंडें । रथ चहुंकडे तेंवि दिसती ॥ ३८ ॥
समुद्र पृथ्वीवरी लोटती । तैसी पायदळा नाहीं मिती ।
इकडे मल्लास पुसोन रमापती । महेश्‍वराजवळीं पातला ॥ ३९ ॥
वर्तमान समूळ सांगितलें । शिळेवरी उगवतील कमळें ।
हेंहि घडे एक वेळे । परि मल्ल शिकविले नायके ॥ ४० ॥
ऎसें ऎकतां कैलासनाथ । निजदळेंसि चालिला समर्थ ।
मल्ल निजभारेंसि लोटत । थरथरित ब्रह्मांड ॥ ४१ ॥
मेघांची बैसली दांतखिळी । चतुर्दश लोक कांपती चळीं ।
शेष कूर्म वराह सकळीं । दणाणिलीं पाताळें ॥ ४२ ॥
भगणें रिचवितीं धरणी । विजा पडती कडकडूनी ।
सप्तदीपें नवखंड अवनी । हलकल्लोळ होतसे ॥ ४३ ॥
उभयदळीं वाद्यगजर । तेणें छप्पन्नदेश जाले बधिर ।
जाला एकचि हाहाकार । कल्पांतप्रलयासारिखा ॥ ४४ ॥
वाटॆ धरणी होईल पालथी । रविमंडप पडेल क्षितीं ।
सृष्टी गेली गेली म्हणती । सुर पळविती विमानें ॥ ४५ ॥
दोहीं सैन्यां भेटी होत । कोट्यवधी असिलता झळकत ।
शरांचा मेघ वर्षत । गारा पडत शिरांच्या तेथें ॥ ४६ ॥
यमराष्ट्रवर्धिनी निम्नगा । शोणितें भरोनि चालिल्या वेगा ।
लवण पाहोन लगबगा । भेटूं धावती सिंधूतें ॥ ४७ ॥
कल्पांतवीज पडे धरणीं । तैसीं घृतमारी आली धावोनी ।
संहारित चालली वाहिनी । देव गगनीं पाहती ॥ ४८ ॥
पर्वत सांठवी मुखांत । ऎसी ते आवली पसरित ।
महाशूल जैसे दंत दिसती ॥ ४९ ॥
शतांचे शत कुंजर धरुनी । गरगरां फिरवीत गगनीं ।
सवेंच घालून वदनीं । चावून गिळी क्षणार्धें ॥ ५० ॥
इभ फिरवून आपटी धरणी । तेथ चूर्ण होती रथश्रेणी ।
अश्‍वांसहित स्वार उचलुनी । दाटी वदनगर्तेत ॥ ५१ ॥
आकाशीं भिरकावी बहुत । ते समुद्रांत जाऊन पडत ।
घृतमारीची हाक गाजत । डळमळीत भूगोल तेणें ॥ ५२ ॥
जिव्हा तिची लंबायमान । तेणेंच आवरी गजास्यनंदन ।
दैत्य शस्त्रें दारुण । घृतमारीवरी प्रेरिती ॥ ५३ ॥
वज्रदाढा कडकडित । चावून गिळिली क्षणांत ।
दैत्यसेना धाकें पळत । मल्ल पहात अद्‍भुत हें ॥ ५४ ॥
कल्पांत हाक फोडून । मल्लें मांडिलें संधान ।
म्हणे, 'कृत्ये ! सैन्य भक्षून । माजलीस बहुत पुष्ट तूं !' ॥ ५५ ॥
मुद्‌गल घेऊन घृतमारी । मल्ल ताडिला ह्रदयावरी ।
मग तीक्ष्णबाण धारीं । दैत्य वर्षे सक्रोधें ॥ ५६ ॥
विजेऎसे येती शर । मुखांत घालुनी गिळी समग्र ।
दैत्यें त्रिशूळें भुजा सत्वर । छेदिला तेव्हां कृत्येचा ॥ ५७ ॥
आणीक भुज सवेंच निघाली । मग दैत्य गेला गगनमंडळीं ।
शिलापर्वत तत्काळीं । वर्षता जाला वरूनी ॥ ५८ ॥
देवसेनेचा संहार होत । घृतमारी गेली गगनांत ।
युद्ध जालें परमाद्‍भुत । मागुती येत भूतळीं ॥ ५९ ॥
यावरि मल्लें तिच्या कपाळांत  । शतबाण भेदिले अकस्मात ।
सत्याहत्तरि बाण सत्य । स्तनावरी भेदिले तिच्या ॥ ६० ॥
नाभी आणि उरावरी । खिळिली शत शत शरीं ।
पर्वत विरूढती तृणांकुरीं । तैसी सर्वांगीं भेदिली ते ॥ ६१ ॥
मूर्छा येऊन पडतां धरणी । त्यावरि मुख्य मार्तंड ते क्षणीं ।
नंदीवरी वळघोनी । चपलेऎसा धाविला ॥ ६२ ॥
मल्ल म्हणे, 'तूं पशुपती । भीक मागणार, स्मशानीं वस्ती ।
 नरकपाळ घेतलें हातीं । चिताभस्म सर्वांगी तुझ्या ॥ ६३ ॥
परम अपवित्र मुंडमाळ । दुर्गंधी गजचर्म अमंगळ ।
भूतें घेऊनि पुष्कळ । निरंजनीं राहसी सदा ॥ ६४ ॥
तुझी स्त्री वृद्ध महाकाळी । दुजी जटेंत लपविली ।
ते तुज सांडून समुद्रास मिळाली । सहस्त्रमुखें चुंबित ॥ ६५ ॥
तूं अभागी कापट्यकोश । तुज पाप पुण्य न कळे नि:शेष ।
सेनेसहित तुझा ग्रास । क्षणमात्रें करीन मी ॥ ६६ ॥
माझें विशाळ शरीर बळ अद्‍भुत । तुज ग्रासीन एक क्षणांत!' ।
यावरि तो खड्‍गधर जगदीश बोलला । ऎक मश्यका वृथापुष्टा ॥ ६७ ॥
तुज मी दिसतों सान । क्षणें तनु तुझी विदारीन ।
भस्में आच्छादिलों द्विमूर्धान । परि क्षणें कानन जाळील ॥ ६८ ॥
कंठीरव दृष्टीं न भरे परी । क्षणांत वारणचक्रे विदारी ।
कुलिश धाकटें शक्रकरी । परि धराधर चूर्ण केले ॥ ६९ ॥
बहु धाकटा वामन । परि ढेंगेंत आटिलें ब्रह्मांड जाण ।
कुंभोद्‍भवाची तनु सान । परि मेदिनीवसन प्राशिला ॥ ७० ॥
लहान दिसे चंडांश । परि कमळभवांडीं न माये प्रकाश ।
तरि तुझा क्षणमात्रें नाश । मीच करीन पाहें आतां ॥ ७१ ॥
पंडितापुढें शतमूर्ख जाण । सव्यापसव्य करी भाषण ।
तैसा तूं जल्पसी पूर्ण । देहांतीं फाटा फुटला तूंतें ॥ ७२ ॥
खांडववनाचा सूड सवेग । वैश्‍वानरास मागे पतंग ।
की विष्णुवहनापुढें उरग । झेपावत आला जैसा ॥ ७३ ॥
तेंवि मणीचा सूड घ्यावया देखा । आलास तूं एथ कीटका ! ।
तरणीच्या किरणावरि पिपीलिका । कैसी चढोन जाईल? ॥ ७४ ॥
कल्पांतविजू धरून वदनीं । केंवि शलभ उडेल गगनीं ।
उर्णनाभीतंतेंकरूनी । बांधवेकेंवि ऎरावत ॥ ७५ ॥
आपलें तेज धुंधुमार । तरणीस दावी वारंवार ।
कीं ब्रीदें बांधोन खर । नारदापुढें गाऊं आला!' ॥७६ ॥
ऎसे तीक्ष्ण शब्द ऎकोन । मल्ल धाविला खड्‌ग घेऊन ।
तें खंडेरायें छेदून । क्षणमात्रें टाकिलें ॥ ७७ ॥
मल्ल तेव्हां चाप ओढून । शर सोडी चपलेसमान ।
परि महाराज मणिप्राणहरण । छेदिता जाला खड्‍गघायें ॥ ७८ ॥
शक्ति सोडीत बळें दैत्य । असिलताघायें त्याही तोडित ।
अग्निअस्त्र मल्ल प्रेरित । चालिली जळत देवसेना ॥ ७९ ॥
शिवें मेघास्त्र घालून । तत्काळ विझविला अग्न ।
मल्लें वातास्त्र सोडून । जलदजाळ विदारिलें ॥ ८० ॥
शिवें पर्वतास्त्र घालून तत्काळ । वात कोंडिला परम सबळ ।
पर्वत फोडिला न लागतां वेळ ।  मल्लें वज्रास्त्र घालुनी ॥ ८१ ॥
दैत्य सोडी माहेश्‍वर । ब्रह्मास्त्र प्रेरी जगदीश्‍वर ।
शक्तिअस्त्र घालून शंकर । म्हैसासुर पळविले ॥ ८२ ॥
दैत्य प्रेरी पादोदर । शिव सोडी त्यावरी खगेंद्र ।
असो, प्रळय वर्तला थोर । युगान्त वाटला महावीरां ॥ ८३ ॥
खड्‍ग हातीं घेऊन । मल्ल भिडला जवळीं येऊन ।
एक हाक गाजली दारुण । विमानें सुरगण पळविती ॥ ८४ ॥
मेघमुखाहून घोष थोर । गडगडा गर्जती दैत्येंद्र ।
देवसेना अपार । आटिली तेणें क्षणार्धे ॥ ८५ ॥
अशुद्धनिम्नगा वहाती । त्यांमाजीं जीत वीर पोहती ।
प्रेतांच्या लाखोल्या पाडिल्या क्षितीं । वस्त्रालंकारीं मंडित हो! ॥ ८६ ॥
शस्त्रांसहित पडिले कर । मुगुटांसहित शिरें अपार ।
ऎसें रण माजिलें अनिवार । संकट वाटे सर्वांसी ॥ ८७ ॥
देवसेना आटली बहुत । ऎसें देखोन हिमनगजामात ।
निर्वाणशस्त्र पाशुपत । काढिता जाला तेधवां ॥ ८८ ॥
गभस्ती पावला अस्त । एकयाम रजनी होत ।
दीपिका पाजळील्या तेथ । तेतीस कोटीं सुरवरीं ॥ ८९ ॥
झळकती दीपिकांचे भंभाळ । हरिद्रचूर्ण उधळे पुष्कळ ।
तेणें पीतवर्ण पृथ्वी निराळ । त्यांत सुर सुमनें वर्षती ॥ ९० ॥
सप्तकोटी मुख्य गण । त्यांसहित खड्‌गराज विराजमान ।
जयजयकार करून । दीपिका सुरगण ओवाळिती ॥ ९१ ॥
म्हणती, 'दयाळा महीपति ! । मल्लास द्यावी यावरि मुक्ति ।
याच्या भयें भयभीत क्षिती । करी निर्वृति सर्वही !' ॥ ९२ ॥
इकडे मल्लें केला संहार । अजा पिटीत जैसा व्याघ्र।
तैसे पळती निर्जर । हांक घोर गाजली ॥ ९३ ॥
ऎसें देखोन उमानाथ । जें सकळ शस्त्रास्त्रांमाजीं समर्थ ।
प्रेरिता जाला पाशुपत । तेजें उजळत ब्रह्मांड हे ॥ ९४ ॥
उगवले सहस्त्रे सहस्त्रकर । तैसें अस्त्र प्रचंड अनिवार ।
कीं कृतांतदंड साचार । उभारला महाप्रळयीं ॥ ९५ ॥
कीं असंख्य विजांचा एक रोळ । कीं प्रळयकाळची जिव्हा सबळ ।
सप्तकोटी मंत्रांचे तेज सकळ । सामर्थ्य तेथ एकवटलें ॥ ९६ ॥
पृथ्वी तडतडं उधळत । शेष मस्तक सांवरित ।
वराहवेष भगवंत । देत दंत सांवरूनी ॥ ९७ ॥
ऎसें चालिलें पाशुपत । तेजें ब्रह्मांड उजळत ।
दोन्ही दळे मोह पावत । येत अकस्मात मल्लावरी ॥ ९८ ॥
त्रुटि न वाजतां ते क्षणीं । शिर छेदून  पाडिलें धरणीं ।
पायांखाले घालूनी । रगडिलें खंडेराजें ॥ ९९ ॥
जाला एकचि जयजयकार । देव वर्षती सुमनें भंडार ।
दीपिका घेऊन समग्र । नाचती तेव्हां रणगोंधळी ॥ १०० ॥
अष्टनायिका नृत्य करिती । नारद तुंबर आनंदें गाती ।
इंद्र ब्रह्मा यश वर्णिती । ऋषि स्तुति करिती सर्व ॥ १०१ ॥
दिव्यदेह पावोन मल्ल अपार । स्तवन करीत प्रीतीनें थोर ।
'मल्लारी हें नाम साचार । एथून वागवीं दयाळा ! ॥ १०२ ॥
तुझें पढती जें माहात्म्य । त्यांचे पुरविसी सकळकाम ।
युद्धामाजीं जय परम । दॆईं त्यांस दयाळा ! ॥ १०३ ॥
मल्लपुत्र पांच जण । कुंभ शूलधर दोघे जण ।
देवगंधर्व लोहार्गल पूर्ण । महाबाहु पांचवा ॥ १०४ ॥
ते पांचही पर्वत करून । स्थापिले भक्तपुत्र म्हणवून ।
त्यावरि धर्मपुत्र सत्य सुजाण । मणिचूल पर्वतीं स्थापिले ॥ १०५ ॥
'तुम्हांस जो द्वेषील त्रासील जाण । त्यास मी सगळेंच ग्रासीन ।
माझ्या भक्तास जो करील विघ्न । त्यास निर्दळीन नेमेंसीं ॥ १०६ ॥
माझे भक्तीस जो रत पूर्ण । त्यास मी अंतर्बाह्य रक्षीन ।
कोठेंहि पडों नेदी न्यून । भक्ताअधीन मी साच!' ।१०७ ॥
त्यावरि कल्पवृक्षातळीं । दोनी लिंगें उत्पन्न जालीं ।
मल्लारी म्हाळसा देव सकळीं । षोडशोपचारें पूजिते जाले ॥ १०८ ॥
मासांमाजीं उत्तम मास । हरीची विभूति मार्गशीर्ष ।
शुद्धपक्षीं चंपाषष्ठीस । शततारका नक्षत्रीं ॥ १०९ ॥
रविवारीं प्रकट अवतार । मणिमल्लमर्दन परमेश्‍वर ।
देव ऋषि गंधर्व नर । यात्रा अपार भरलीले ॥ ११० ॥
तें अवतारस्थळ साचार । महाराज क्षेत्र प्रेमपुर ।
प्राकृत लोक म्हणती पेंभर । निजमाहेर भक्तांचें ॥ १११॥
मुख्यस्थल प्रेमपुर पाहीं । मग भक्तांलागीं प्रगटला ठायीं ठायीं ।
स्थापना किती मिती नाहीं । पूजा घेत भक्तांची ॥ ११२ ॥
म्हणोन पुराणप्रसिद्ध स्थळ । तें प्रेमपुर निर्मळ ।
निजभक्त जाणती प्रेमळ । सुख तेथिंचें कैसें तें ॥ ११३  ॥
जेथिंचे यात्रेस अभिनव । स्वर्गीहून येती देव ।
अष्टनायिका आणि गंधर्व । नृत्य गायन करिती तेथें ॥ ११४ ॥
मणि आणि मल्ल । अश्‍वारूढ दोघे द्वारपाळ ।
होउनी तिष्ठती सर्व काळ । प्रेमपुरीं शिवापुढें ॥ ११५ ॥
तेथिंचा महिमा अपार । वर्णूं न शके सहस्त्र वक्त्र ।
ते स्थळीं जाऊन पूजिती जे नर । त्यांस इहपरत्र सुखरूप ॥ ११६ ॥
ब्रह्मादि शक्र ऋषि मिळोनी । मृत्तिकेचीं लेपें करोनी ।
प्राणप्रतिष्ठा करितां तत्क्षणीं । सजीव जालीं रूपें तींच ॥ ११७ ॥
म्हाळसा गंगा दोघी जणी । दोहींकडे विलसती कामिनी ।
दिव्यवस्त्रीं दिव्याभरणीं । दैदीप्यवंत सर्वदा ॥ ११८ ॥
देव म्हणती, 'मल्लारी! । तूं कुळदैवत ज्याचे घरीं ।
त्याचे सर्व काम पूर्ण करीं । उणें तिळभरी पडों नेंदी ॥ ११९ ॥
अष्टगंधें आणि भंडार । आरक्तपुष्पें गुंफून हार ।
अर्चिती जे म्हाळसाप्रियकर । तेचि नर धन्य पै ॥ १२० ॥
तुझें माहात्म्य करिती पठण । श्रवण करिती भावेंकरून ।
त्यांचे मनोरथ पुरवून । विजय करीं सर्वस्थळीं !' ॥१२१ ॥
चंपाषष्ठीच्या दिवसांत । सहा दिवसपर्यंत ।
त्रिकाळ जे प्राणी पढत । नाहीं अंत भाग्या त्यांच्या ॥ १२२ ॥
त्रिमास पठण करितां नित्य । पोटीं पुत्र होईल प्रतापवंत ।
लक्ष्मी घरीं अमित । नित्य काळ तयाचे ॥ १२३ ॥
ग्रहपीडा पिशाच भूतावळी । यांची पीडा नव्हे कदाकाळीं ।
षण्मास पढतां त्रिकाळीं । महाव्याधि दूर होये ॥ १२४ ॥
धान्यक्षेत्रीं जे पठण करित । तेथ पीक होय परमाद्‍भुत ।
दक्षणामुख पढतां मासांत । शत्रुक्षय होय पैं ॥ १२५ ॥
आदित्यवारीं पुस्तक पूजोन । जे करिती हें माहात्म्यश्रवण ।
नष्टद्रव्य सांपडे पूर्ण । तस्करउपद्रव नव्हे कधीं ॥ १२६ ॥
आधिव्याधी दूर करून । मृत्यू दरिद्र संहारून ।
भक्तगृहीं मणिमल्लमर्दन । रात्रिदिवस राहे सुखें ॥ १२७ ॥
त्याचें ऋण मल्लारी । आपण आंगें परिहारी ।
ग्रामास गेला बहुदिन दुरी । तोही भेटे श्रवणें याच्या ॥ १२८ ॥
चतुर्दश अक्षरांचा मंत्र । गुरुमुखें शिकती जे साचार ।
त्यांचे घरीं सर्व प्रकार । म्हाळसावर पुरवील सदा ॥ १२९ ॥
यंत्रपूजन मंत्रधारण । सहस्त्रनाममंत्रश्रवण ।
जे भक्त करिती अनुदिन । प्रपंच परमार्थ गोड त्यांचा ॥ १३० ॥
चंपाषष्ठीस जाण । द्यावें ब्राह्मणास उत्तम भोजन ।
रोट वृंताकशाक क्षीरोदन । प्रिय पूर्ण मल्लारीतें ॥ १३१ ॥
एथे मूर्ख बुद्धिहीन । म्हणती, करावें पलांडूभक्षण ।
हें मूळ ग्रंथ पाहतां शोधून । संस्कृतीं नाहीं सर्वथा ॥ १३२ ॥
सनत्कुमारीं हे कथा । मनूप्रती सांगितली तत्वता ।
मल्लारिकवच मंत्र पढतां । निर्भय भक्तां सर्वकाळ ॥ १३३ ॥
प्रेमपुराभोवतीं तीर्थें असतीं । अष्टतीर्था आणिक नाहीं मिती ।
तीं वर्णिलीं मूळ ग्रंथीं । नाना रीतीं ऋषींनीं ॥ १३४ ॥
जैशीं वाराणशीस बहुत तीर्थें तैसींचि प्रेमपुरीं अद्‌भुतें ।
पापसंहारकें अमितें । सनत्कुमारीं वर्णिलीं बहु ॥ १३५ ॥
तीर्थविधी करावा पर्वकाळीं । सर्वस्वें तोषविजे कपाळमाळी ।
मुख्य याग विप्र सकळीं । धनधान्यदानीं पूजावे ॥ १३६ ॥
महानवमीचे दिवशी । अगत्य पूजावें मणिमर्दनासी ।
त्यावरि पूर्णिमा कार्तिकमासीं ते दिवशीं पूजावा तो ॥ १३७ ॥
त्यावरि मुख्य चंपाषष्ठी । ते दिवशीं अर्चावा धूर्जटी ।
ते भक्त कधीं संकटीं । न पडतीच जाणिजे ॥ १३८ ॥
प्रेमपुर देखिलें नाहीं नयनीं । तरी माहात्म्य ऎकावें श्रवणीं ।
कवच सहस्त्रनाम पढोनी । मंत्र यंत्र आराधिजे ॥ १३९ ॥
तेणें सर्वपापसंहार । अष्टादश कुष्ट समग्र ।
नाना रोग पीडा करणार । श्रवणपठणें दूर होती ॥ १४० ॥
मूर्तीपुढें बैसोन । माहात्म्य वाचावें, करावें श्रवण ।
पार्यातकपुष्पें आणून । मल्लारीस अर्चावें ॥ १४१ ॥
आठां दिवसां आदित्यवारीं । भक्तीं अर्पिजे प्रीतीं मल्लारी ।
पीतवर्ण तंदूळ कल्हारी । भक्तकैवारी अर्चावा ॥ १४२ ॥
वसंतऋतूंत मल्लारीस । करिजे बहुत पूजाविलास ।
महिमा वर्णितां शेष । लज्जित होय प्रेमपुरींचा ॥ १४३ ॥
ब्रह्मांडपुराणीं क्षेत्रखंड । तेथींचें हें माहात्म्य अति गोड ।
श्रवणें पुरवी सकळ कोड । न पडे चाड इतरांची ॥ १४४ ॥
प्रेमपुराजवळी शिवगया पूर्ण । जे तेथ करिती पिंडदान ।
त्यांचे पूर्वज उद्धरोन । शिवलोकाप्रती जाती ॥ १४५ ॥
मेघवाहन नगरीं भाग्य विशेष । चंद्रानन नामें होता वैश्‍य ।
कुटदुर्मती  नाम त्याच्या पुत्रास । परम नष्ट द्र्व्यलुब्धी ॥ १४६ ॥
कपटताजवा करून । ग्राहकांस नाडी रात्रंदिन ।
पुढें ती मृत्यु पावोन । काग जन्माप्रति गेला ॥ १४७ ॥
मुखीं यावानल धरूनी । अंतरिक्ष जातां गगनीं ।
गयापदावरी येऊनी । क्षणएक स्थिरावला ॥ १४८ ॥
मुखींचे यावानल सुटोन । गयापदीं पडिलें गळोन ।
सदाशिवें संतोषोन । पिंडदान मानिलें ॥ १४९ ॥
त्याचे पितृगण नरकीं पडिले । ते नेऊन कैलासीं स्थापिले ।
ऎसीं तीर्थें तेथ प्रबळें । महिमा अपार न वर्णवे ॥ १५० ॥
ब्रह्मानंदे जोडून कर । चतुर पंडितां विनवी श्रीधर ।
आमचे पूर्वज सर्व योगीश्वर । तिहीं देव अर्चिला हा ॥ १५१ ॥
पंढरीहून पश्‍चिमेस देख । नाझरें नाम पुण्यकारक ।
ह्याखालें ग्राम सुरेख । वाटंबर नाम त्याचें ॥ १५२ ॥
वडिलांची भक्ति अभिनव । देखोनि प्रेमपुरीचा राव ।
मायागंगातीरीं निजभाव । पाहोनिया प्रकटलासे ॥ १५३ ॥
ज्ञानानंद ब्रह्मानंद । उभयबंधु जगप्रसिद्ध ।
त्यांचे चरणाब्जीं मिलिंद । श्रीधर स्वानंद अभंग सदा ॥ १५४ ॥
संस्कृत बावीस अध्याय उत्तम । ग्रंथ जाणिजे मल्लारिमाहात्म्य ।
त्याची प्राकृत टीका सप्रेम । दो अध्यायांत कथियेली ॥ १५५ ॥
ब्रह्मानंदा श्रीधरवरा । म्हळसाह्रुदयारविंदभ्रमरा ।
भक्तवत्सला करुणासमुद्रा । अतिउदारा अभंगा ! ॥ १५६ ॥
॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारिमाहात्म्यं सम्पूर्णमस्तु ॥

Bookmark and Share