Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

सण - यात्रा - उत्सव

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये सर्वसाधारणपणे वर्षामध्ये सात ते आठ यात्रा भरतात,या व्यतिरिक्त काही खास उत्सव हि साजरे केले जातात.जुन्या ग्रंथांमधून जेजुरीमध्ये वेगवेगळे उत्सव साजरे होत असल्याचा उल्लेख सापडतो परंतु त्यातील वैशाखातील हिंदोळा व फाल्गुनातील टिपरी सारखे उत्सव कालौघात बंद पडले तर काही अजूनही मोठ्या प्रमाणात साजरे होतात.

चैत्र पौर्णिमा

गणपूजा

विजयादशमी

चंपाषष्ठी

पौष पौर्णिमा

माघ पौर्णिमा

महाशिवरात्री

सोमवती अमावस्या

गुरुपौर्णिमा


www.jejuri.in


Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

श्रीक्षेत्र जेजुरीतील यात्रा उत्सव

शालिवाहन शके १९३७ मन्मथनाम संवत्सरामधील 
श्रीक्षेत्र जेजुरीतील यात्रा उत्सव

चैत्र शु.१५चैत्र पौर्णिमाश्रीमार्तंड भैरव अवतार दिन ०४//२०१५
वैशाख कृ.१५सोमवतीपर्वणी स्नान पालखी सोहळा१८/०५/२०१५
आषाढ शु.१गणपुजाश्रीकडेपठारलिंग भंडारपुजा १६/०७/२०१५
आषाढ शु.१५गुरूपौर्णिमाश्रीकडेपठारलिंग श्रीखंडपुजा३०/०७/२०१५
श्रावण शु. नागपंचमीनागपुजा१९/०८/२०१५
श्रावण शु.  श्रीयाळ षष्ठीश्रीयाळशेठ पुजन२१/०८/२०१५
श्रावण शु.१५श्रावण पौर्णिमाश्रीखंडोबा बाणाई विवाह२९/०८/२०१५
भाद्रपद कृ.१५ सोमवतीपर्वणी स्नान पालखी सोहळा१२/१०/२०१५
आश्विन शु. घटस्थापनाशारदीय नवरात्र प्रारंभ१३/१०/२०१५
आश्विन शु.१०विजयादशमीमर्दानी दसरा२२/१०/२०१५
मार्ग. शु.घटस्थापनामार्तंडभैरव षडःरात्रोत्सवारंभ१२/१२/२०१५
मार्ग. शु.५ तेलहंडाश्रीखंडोबा म्हाळसा तैलस्नान१६/१२/२०१५
मार्ग. शु.चंपाषष्ठीश्रीमार्तंडभैरवोत्थापन १७/१२/२०१५
पौष शु. १३मृग नक्षत्रश्रीखंडोबा म्हाळसा विवाह२१/०३/२०१६
पौष शु.१५पौष पौर्णिमाशिखरकाठी व गाढव बाजार२३/०१/२०१६
पौष कृ.१५सोमवती पर्वणी स्नान पालखी सोहळा०८/०२/२०१६
माघ शु.१५माघ पौर्णिमापालखी व शिखरकाठी दर्शन २२/०/२०१६
माघ कृ. १४महाशिवरात्रस्वयंभू गुप्तलिंग दर्शन०७/०३/२०१६
फाल्गुन शु.  प्रक्षालनश्रीकडेपठार थोरली पकाळणी१०/०३/२०१६
फाल्गुन शु हुताशनीहोळी२३/०३/२०१६
फाल्गुन कृ. धूलिवंदनभस्मस्नान२४/०३/२०१६
फाल्गुन कृ. रंगपंचमीरंगोत्सव, हेगडीप्रधान विवाह२८/०३/२०१६

 

चैत्र षडःरात्रोत्सव

मार्तंड विजय ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक ३० मधील ओवी क्रमांक  ७३ ते ८१ मध्ये चैत्र महिन्यातील षडःरात्रोत्सवाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ मागील दोन शतकामध्ये हा उत्सव श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये उत्साहात साजरा केला जात होता. 
चैत्र शुक्ल दशमी ते चैत्र पौर्णिमा असे हे षडःरात्र असून या कालावधीमध्ये मोठ्या आनंदामध्ये भजन,कीर्तन, प्रवचन आणि पारायण केले जात असल्याचे वर्णन आहे. चैत्र पौर्णिमेला सप्तऋषींच्या व्यथा ऐकून भगवान शंकरांनी श्रीमार्तंड भैरव अवतार धारण केला म्हणून चैत्र षडःरात्र साजरे केले जाते. असे हे चैत्र षडःरात्र आपणांस आनंददायी जावे हीच मल्हार चरणी प्रार्थना…………

चैत्र पौर्णिमा

हिंदू कालगणनेनुसार येणारा वर्षातील श्रीखंडेरायाचा पाहिला मोठा उत्सव विविध जाती जमातींचा सहभाग असलेली यात्रा. धर्मपुत्र सप्तऋषींच्या तपसाधने मध्ये व्यत्यय निर्माण करणा-या मणी मल्ल दैत्यांविरुद्ध दाद मागण्यासाठी ऋषीगण  देवेंद्राच्या अमरावती नगरी व विष्णूंच्या वैकुंठनगरी  मार्गे कैलासावर पोहोचले. सप्तऋषींनी मणी व मल्लासुर दैत्यांचे दुष्कृत्य वर्णन केल्यानंतर श्रीभगवान शंकरानेमार्तंड भैरव अवतार धारण केला त्याचा काळ सांगताना मार्तंड विजय ग्रंथामध्ये खालील वर्णन आलेले आहे,

चवदामाजी दुसरा मनु, स्वारोचिष असे अभिधानु l
त्याचे एकतिसावे द्वापार परिपूर्णु l होता अवतार जालासे ll

त्या द्वापाराची समाप्ती आली l अठ्ठ्यांशी सहस्त्र दिवस राहिली l
ते दिवशी चंद्रमौळी भयंकर रूप धरीतसे ll

वसंत ऋतू चैत्र मास l शुक्ल पक्ष दोन प्रहर दिवस l
चित्रा नक्षत्र तुळ रोहिणी विलास l तेव्हा रूप
धरी उमापती ll

चौदा मनुमधील द्वितीय स्वारोचिष नामक मनूच्या एकतिसाव्या द्वापार युगाच्या समाप्तीला अठ्ठ्याऐंशी हजार दिवस बाकी असताना वसंत ऋतूतील चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात तसेच नभांगणात तुळ राशीतील चित्रा नक्षत्रामध्ये चंद्र असताना उमापतीने मार्तंड अवतार धारण केला.

चैत्र पौर्णिमेला अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मोठी यात्रा भरते हि यात्रा तीन ते चार दिवस चालते. मार्गशीर्ष महिन्यातील षडःरात्रोत्सावा प्रमाणेच चैत्र शुक्ल नवमी ते पौर्णिमा असे चैत्र षडःरात्रोत्सव साजरे केले जाते.


गणपूजा (दि.१७/०७/२०१५)

श्रीभगवान शंकर महादेव जगत्कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये  कैलासावरून भूतलावर अवतरले तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा यादिवशी देव गणांनी श्री मार्तंड भैरवाची भंडा-याने पूजा केली तेव्हापासून हा शुभ दिवस 'गणपूजा' या नावाने ओळखला जातो.आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. कडेपठार देवता लिंग मंदिरामध्ये रात्री नित्य नेमाची पूजा झालेनंतर मानकरी देवावर भंडार वाहतात त्यापाठोपाठ सर्व भक्तमंडळी भंडार वाहतात अशा पद्धतीने स्वयंभू लिंगावर भांडाराच्या राशी उभ्या राहतात त्यानंतर देवाची आरती होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो तो रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये चालतो.
 वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकारांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याने प्रत्येकजण आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करतात.
  छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर देवाचे अंगावरील भंडार भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.


 

 

मर्दानी दसरा (दि.२५/१०/२०२०)

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत जेजुरगडावर नवरात्रोत्सव परंपरागत पद्धतीने उत्साहात साजरा होत असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला श्रीखंडोबा व म्हाळसा देवींचे मूर्तींना पंचामृत स्नान झालेनंतर बारद्वारी मधील देवघरामध्ये प्रतिष्ठापना होते. व पुढील नऊ दिवस देवासमोर अहोरात्र संगीत, मनोरंजन, लोकनृत्य, सनई चौघडा व भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम सादर केले जातात.या कार्यक्रमांसाठी स्थानिक कलाकारांसोबत बाहेरगावचे कलाकार सुद्धा कोणतीही अपेक्षा न ठेवता आवर्जून सेवेसाठी हजर राहतात.विजयादशमीला घटोत्थापना झाल्या नंतर देव भंडारगृहात बसविले जातात. 'मर्दानी दासरा' सुरु होतो तो सायंकाळी गोरज मुहूर्तावर सुरु होतो, यावेळी देवाच्या मूर्ती पालखी मधून सीमोल्लंघनासाठी गडाबाहेर पडतात.जेजुरगडाच्या दक्षिणेकडील डोंगरपायथ्याला रमण्यात पालखी खाचखळग्यांमधून ओढ्यानाल्यातून मार्गक्रमण करीत विसावते त्याचवेळी कडेपठार मंदिरातील मूर्तींची पालखी 'सुसुरटिंगी'ची अवघड टेकडी चढून  शिलंगणाचे सोने लुटून रमण्याच्या डोंगरमाथ्यावर विसावते दोन्ही बाजूला शोभेच्या दारूची आतिषबाजी होते अतिशय नयनरम्य असा स्वर्गीय सोहळा भाविक भक्तांना याची देही याची डोळा पहावयास मिळतो. दोन्ही पालखीतील मूर्तींची प्रतिबिंबे एकमेकांच्या पालखीतील आरशामध्ये दिसल्यानंतर नजरभेट झाल्याची इशारत दिली जाते व दोन्ही पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात.परतीच्या प्रवासामध्ये जेजुरगडावरील पालखी सोने लुटून पेशवे तलाव मार्गे स्मशान भूमिमधील मंदिराला शिडाची भेट देऊन जुनीजेजुरी मध्ये विसावते. त्यानंतर आनंदनगर वरून नगरपरिषद चौकामध्ये येते तेथे रावण दहन करून भुईनळ्यांच्या व हवाईच्या प्रकाशात मारुती मंदिराजवळ नजरपेठे मध्ये येते.नंदीचौकातून पालखी पायरी मार्गाला लागते पाय-यांचे अवघड चढण चढल्यानंतर महाद्वारातून पालखी गडावर प्रवेश करते,पालखी गडावर पोहोचल्यानंतर महाद्वाराच्या डावीकडील भागात एक मण वजनाचा खंडा ( तलवार ) उचलण्याच्या व कसरतीच्या स्पर्धा होतात, अत्यंत रोमहर्षक कसरती पाहून अंगावर काटा उभा राहतो. पालखी प्रदक्षिणा पूर्ण करून बारद्वारीमध्ये विसावते व मूर्ती भंडारगृहामद्ये ठेवल्या जातात. त्यानंतर खांदेकरी व सेवेकारींना देवाच्या शेतातील धान्य रोजमुरा ( रोजगार ) म्हणून दिले जाते.


मार्तंड भैरव षडःरात्रोत्सव...........

मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी श्रीशंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला व त्यांना युद्धासाठी प्रवृत्त केले. युद्धाला प्रारंभ झाला तो मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला,युद्धामध्ये देवसेनेच्या यश प्राप्तीसाठी सप्त ऋषींनी एक प्रतिष्ठान स्थापित केले व जसे जसे विजय प्राप्त होवू लागला तसे प्रत्येक दिनी पुष्पमाला त्या प्रतिष्ठानावर अर्पण करु लागले, तेव्हा पासून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी असा सहा दिवस उत्सव साजरा होत असतो. बोलीभाषेमध्ये याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात.सहा दिवस मंदिर व गाव विद्युत रोषणाईने उजळून निघते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरामधील उत्सव मूर्तींना पंचामृत स्नान घालून षोडोःपचारे पूजा केली जाते व सहा दिवस बारद्वारीतील देवघरामध्ये तर कडेपठार येथे मंदिरातील मूर्ती भंडारघरामध्ये प्रतिष्ठापित केल्या जातात. प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस बारद्वारीमध्ये देवासाठी अहोरात्र सनई-चौघडा,नृत्य, संगीत, भजन, गायन, कीर्तन व पोथीवाचन असे विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळामध्ये भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असते. 

 

तेलहंडा अर्थात देवाचे तेलवण (बुधवार दिनांक २६/१/२०१)

पौष महिन्यामध्ये पाल येथे श्रीखंडोबा म्हाळसा विवाह सोहळा साजरा होत असतो,त्यापूर्वी बरोबर सव्वा महिना अगोदर श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये  देवाच्या तेलवण हळदीचा कार्यक्रम आयोजित केला जातो तो मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला. कडेपठार देवतालिंग मंदिरामध्ये देवाची सर्व आयुधे घेऊन तेलहंडा सोहळा निघतो व मंदिराला सनईच्या सुरात मंदिराला प्रदक्षिणा मारून नंदी मंडपासमोरील कासवावर पोहोचतो, त्यानंतर मानकरी व ग्रामस्थांचे तेल गोळा केले जाते. जेजुरगडावरील मंदिरामधून कोळी समाजातील व्यक्ती हंडा घेऊन पूजा-यांसह वाजत गाजत नजरपेठेतील चावडीमध्ये येतात. वीर व चोपदार पुकारा करून मानक-यांना हंड्यामध्ये तेल ओतण्यासाठी निमंत्रित करतात. सर्व मानक-यांचे घालून झाल्यानंतर इतर ग्रामस्थ व भाविक हंड्यामध्ये तेल ओततात.तदनंतर  वाजत गाजत हा सोहळा दिवटी बुधलीच्या प्रकाशात व सनईच्या सुरात पहिल्या पायरी जवळ येऊन पोहोचतो, यावेळी नाईक समाजाचे लोक हंड्यामध्ये तेलाबरोबरच एक सजविलेला बाण ठेवतात. तदनंतर हा सोहळा मंदिरामध्ये पोहोचतोपरीट समाजातील लोकांकडून देवासमोर धान्याचा चौक भरला जातो व देवाला गाणी म्हणून तेलाची अंघोळ घातली जाते.अशा रितीने देवाच्या तेलवणाचा कार्यक्रम पार पडतो.

 

चंपाषष्ठी (गुरुवार, दिनांक //२०१

 

चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी

मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ll

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म

त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ll

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये या दिवशी पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम असतात. स्वयंभू लिंगावर भाताची पूजा बांधण्यात येते त्यानंतर पंचामृत अभिषेक होतो. पूजा आरती झालेनंतर बारद्वारीतील मूर्तींना पंचामृत अभिषेक घालून घटोत्थापणा केली जाते. या दिवशी वर्षातून फक्त एकदाच श्रीना पुरणा-वरणाच्या नैवेद्या बरोबरच वांग्याचे भरित रोडग्याचा नैवेद्य दाखविला जातो.


पौष पौर्णिमा (गुरुवार,दि.२७ जानेवारी २०१३)

पौष शुद्ध पौर्णिमेला श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये मोठी यात्रा भरते, यावेळी शिखर काठ्यांचा ध्वजोत्सव साजरा होतो. पौर्णिमेपूर्वी दोन दिवस अगोदर मृग नक्षत्रावर सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पाल येथे श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. हत्तीवरील मिरवणूक हे तेथील यात्रेचे प्रमुख आकर्षण असते.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच ठिकाणी गाढवांचा बाजार भरला जातो त्यापैकी एक मढी (जिल्हा अहमदनगर) व दुसरे जेजुरी येथे पौष पौर्णिमेला.या दिवशी फार मोठी उलाढाल होते. गुजरात मधील सुप्रसिद्ध काठेवाड जातीच्या गाढवांना येथे मागणी असते.गुजरात, कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश मधून या यात्रेमध्ये भटके विमुक्त समाजातील लोक  बहुसंख्येने उपस्थित असतात. बंगाळीच्या पटांगणा मध्ये हा बाजार भरतो पूर्वी मोठा बाजार भरला जायचा परंतु अलीकडे जागे अभावी बाजार लहान होत चालला आहे.
पौर्णिमेच्या दुस-या व तिस-या दिवशी येथे विविध भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायती भरतात. यामध्ये समजातील नाते संबंधातील वाद तसेच समाजबाधक कृत्य आदी तक्रारी पंच मंडळींसमोर येत असतात. त्यावर पंच मंडळी न्याय निवडा करून सलोखा घडवून आणतात.याप्रसंगी काही समाज कुस्तीचा आखाडाही भरवितात.

 


माघ पौर्णिमा (सोमवार,दि.२५ फेब्रुवारी २०१३)

  श्रीखंडोबा म्हाळसा विवाह सातारा जिल्ह्यातील पाल येथे पार पडल्यानंतर माघ पौर्णिमेस जेजुरी येथे देवाच्या भेटीसाठी गावोगावच्या पालख्या येत असतात, कोकण किनारपट्टीवरील मासेमारीचा व्यवसाय असणा-या सोनकोळी समाजाचा जेजुरीच्या कुलस्वामी खंडेरायावर विशेष श्रद्धा असल्याने कोणत्याही महत्वाच्या कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी जेजुरीचे खंडेरायाचा कौल घेण्याची प्रथा आहे. अशा या सोनकोळी कुटुंबियांचे गावोगावचे प्रमुखांकडे कुलस्वामी खंडेरायाचे टाक अथवा मूर्ती असतात, त्यांना वाजत गाजत पालखीतून जेजुरीच्या खंडेरायाच्या भेटीला आणण्याची वर्षानुवर्षे परंपरा आहे. माघ पौर्णिमेच्या यात्रेसाठी कोकणातील गावागावातून येणा-या पालख्या पौर्णिमेपूर्वी एक अथवा दोन दिवस अगोदर श्रीक्षेत्र जेजुरी येथे मुक्कामी येऊन राहतात. प्रत्येक पालखीसोबत छत्री, अब्दागिरी, चौरी असा सारा सरंजाम असतो. पालखी सुंदर मखमली वस्त्रे आणि फुलांनी सजविलेली असते काही पालख्या चांदीच्याही असतात.प्रत्येक समूहाची आपली ठरलेली जागा असते त्याठिकाणी सार्वजन एकत्रित जमून पालखीतील देवांची पूजा आरती करतात. माघ पौर्णिमेला सायंकाळी जेजुरी गावातून वेगवे गळ्या दिशेने वाजत गाजत पालख्या मंदिरात जात असतात त्यावेळी उपस्थित सर्व कोळी  बांधव   'सदानंदाचा येलकोट' 'येलकोट येलकोट जयमल्हार' अशा पद्धतीने कुलस्वामी खंडेरायाचा जयजयकार करीत भंडारा आणि खोबरे उधळीत असतात.

त्याबरोबरच ढोली-बाजा किंवा वाद्यवृंद पथकाच्या तालावर ठेका धरून नाचत असतात. पारंपारिक कोळी गीतांबरोबरच उडत्या चालीच्या गीतांचे संगीत उपस्थित सर्वांनाच ठेका धरायला लावते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. अगदी पुरुष महिला असा कोणताही भेदभाव न बाळगता या आनंदोत्सवात सहभगी होत असतात. 

शिखरकाठी अर्थात ध्वज पताका

 मल्हारी मार्तंडानी असुरी शक्तींचा संहार करून संपूर्ण जगत सुखी व आनंदी केले तो आनंदोत्सव म्हणून आणि देवाच्या उत्सवांचे वेळी आपल्या घराण्याची परंपरा किंवा नवसाप्रित्यर्थ शिखरकाठी वाजतगाजत मंदिराच्या शिखराला लावण्याची प्रथा असते. वेळूच्या उंचच्या उंच (साधारणपणे वीस तें पंचवीस फूट)काठीला रंगीबेरंगी वस्त्राने अच्छादलेले असते आणि वरच्या टोकाला मोरपीस आणि आपल्या घराण्याची ओळख असणारे बोध चिन्ह लावलेले असते आणि खालील जाड बाजूस तीन ते साडेतीन फूट अंतरावर काठी पेलण्याकरिता एक जाड फळी लावलेली असते तर मध्यावर तोल सांभाळण्यासाठी दोन अथवा तीन दो-या बांधलेल्या असतात. शिखरकाठी उचलणे आणि तोल सांभाळत हलगीच्या तालावर नाचणे याला एक कसब लागते मध्यावर बांधलेल्या दो-या बाजूचे सहायक जरी धरीत असले तरी प्रमुख भूमिका हि शिखर काठी उचलणा-याचीच असते. श्रीक्षेत्र जेजुरी येथे पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा या दोन यात्रांना शिखर काठ्यांची गर्दी होत असते, माघ कृष्ण प्रतिपदेला शिखर काठी शिखराला लावण्यासाठी चढाओढ लागत असते. संगमनेर येथील होलम, सुपे येथील खैरे पाटील आणि जेजुरी ग्रामस्थांच्यावतीने होळकर संस्थानची शिखरकाठी या मनाच्या शिखरकाठ्या मानल्या जातात. ब्रिटीश काळामध्ये काठ्या शिखराला भेटविण्याच्या मानावरून वाद निर्माण होऊ लागल्याने जेजुरी ग्रामस्थ व होळकर संस्थानने मध्यस्थी करून समझोता घडवून आणला व ग्रामस्थांच्या वतीने होळकरांची मानाची शिखरकाठी देव भेटीस येऊ लागली.अशा प्रकारे मानाच्या तीन शिखरकाठ्या व इतर गावोगावच्या शिखरकाठ्या असा  हा ध्वजोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो.

 

 


महाशिवरात्री (रविवार,दि.१० मार्च २०१३)

माघ कृष्ण चतुर्दशी अर्थात महाशिवरात्र जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्याप्रमाणेच जेजुरीमध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. वर्षातून फक्त एकदाच गुप्त मल्लेश्वराचे दर्शन होत असल्याने भाविकांची अलोट गर्दी लोटते. यासंदर्भातील कथा 'जयाद्री महात्म्य' ग्रंथामध्ये सत्ताविसाव्या अध्यायामध्ये आली आहे ते असे, श्रीखंडोबाने चंदनपुरीतील बाणाई बरोबर नळदुर्ग येथे श्रावण पौर्णिमेस विवाह केला व त्यानंतर जेजुरी येथील महालामध्ये गुप्तपणे वास करून राहिले. महालाबाहेर श्रीखंडोबाचे वाहन नंदी उभा असल्याने म्हाळसेने  महाराजांविषयी चौकशी केली असता नंदीने उत्तर देण्यास असमर्थता दर्शविली तेव्हा खुणेने महाराज कोठे आहेत ते दाखवावे असे सांगितल्यानंतर नंदीने वायव्य दिशेकडे मान वळविली व महाराजांचे स्थान दाखविले. त्यानंतर महाराज बाणाईसह प्रकट झाले तो दिवस होता महाशिवरात्रीचा म्हणून आजही फक्त याच दिवशी बाणाईसह खंडोबाचे दर्शन होते.मंदिरासमोरील नंदीची मान आजही वायव्य दिशेकडे कललेली आजही आपणास पहावयास मिळतेमुख्य मंदिरावरील शिखारामध्ये एक द्विलिंग आहे ते सुद्धा याच दिवशी उघडते म्हणून तर महाशिवरात्रीला भूलोक ,पाताळलोक व स्वर्गलोक अशा तीनही लोकाची एकाच दिवसात दर्शन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.



सोमवती अमावस्या

कृष्ण पक्षातील अखेरची तिथी अर्थात अमावस्या सोमवारी आल्यास त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात,हिंदू धर्मामध्ये या तिथीला अनन्य साधारण महत्व आहे व हि एक पर्वणी असल्याने संपूर्ण हिंदूस्थानातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या पर्वणी निमित्ताने देवतांना नदी स्नानासाठी नेले जाते.परंतु या सर्व तीर्थ क्षेत्रांमध्ये जेजुरीचा सोमवती पर्वणी सोहळा विलोभनीय असा असतो.या पर्वणी विषयी  धार्मिक संदर्भ असे आहेत कि  खंडोबाला शिवाचा अवतार समजले जाते व शंकराच्या डोक्यावर चंद्रकला सततच असते, अमावस्येला चंद्र जरी दिसत नसला तरी तो शंकराच्या डोक्यावर सततच विराजमान असतो, या समजुतीने व सोमवार हा शंकराचा वार म्हणून सोमवती अमावस्या ही खंडोबाच्या भक्तांना प्रिय आहे. या संबंधातील कथा अशी सांगितली जाते -
देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले व त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यात रंभा नावाची एक अप्सरा होती. तिच्या मनात अशी इच्छा होती, शंकराने आपणास वरावे. परंतु रंभा इंद्राच्या वाटेला आली त्यामुळे रंभेच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिली. नारदाच्या सांगण्यानुसार तिने शिवाचा जप केला व
शंकर महादेव प्रसन्न झाले. 'मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईन त्यावेळी तू माझी पत्नी होशील' असा वर शंकराने तिला दिला. त्यानुसार सोमवती अमावास्येला त्याने रंभेची मनोकामना पूर्ण केली.म्हणून श्रीखंडोबा म्हाळसादेवीसह पर्वणी स्नानाचे वेळी  क-हा नदीवर रंभाई मंदिरात जातात. 
पर्वणी स्नानासाठी श्रीखंडोबा-म्हाळसा मूर्ती मंदिरातून पालखीमध्ये ठेवून नेल्या जातात.महाद्वारातून पालखी बाहेर पडते व बाणाई मंदिराकडून नंदी चौकामध्ये येते,त्यावेळी पालखी पुढे देवाचा घोडा सामील होतो.नंदी चौकातून पालखी डावीकडे वळून अहिल्यादेवी चौक मार्गे गोसावी मठाकडून मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे विसाव्यासाठी थांबते. त्यानंतर होळकर संस्थानची मानाची छोटी पालखी सोबत घेऊन हा पालखी सोहळा लेंडी ओढामार्गे मशिदीकडून मराठीशाळा, शिवाजी चौकातून पुढे मरीआई मंदिराजवळ विसाव्यासाठी जातो.या ठिकाणी लंगर तोडला जातो.मरीआई मंदिराच्या उजव्या बाजूने पालखी धालेवाडी कडे प्रस्थान ठेवते.मध्ये ठरलेल्या ठिकाणी विसावे घेत पालखी सोहळा क-हा तीरावर रंभाई मंदिरामध्ये येतो. त्यानंतर श्रींचे मूर्तींना पर्वणी स्नानासाठी पालखीतून बाहेर काढले
जाते तेव्हा देवाला स्नान घालण्यासाठी भाविकांची झुंबड उडते.  पर्वणी स्नानानंतर पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघतो,धालेवाडी येथे बाबीरबुवा मंदिराला शिडाची भेट देवून चौकामध्ये विसावतो.तेथून पुढे फुलाई माळीनीच्या विसाव्यावर थांबल्यानानंतर पुढे नि घताना मूर्तींचा ओलांडा केला जातो.(ओलांडा म्हणजे श्रींच्या मूर्ती मोठ्या पालखीतून काढून होळकर संस्थानच्या मानाच्या पालखीमध्ये ठराविक अंतरासाठी ठेवल्या जातात.) तेथून पावूतका मार्गे जानुबाई मंदिरामध्ये उशिरापर्यंत पालखी थांब ते.
पालखी सोहळा रात्रीच्या पहिल्या प्रहरात जानुबाई मंदिरातून हलतो व गायमुख मार्गे मारुती मं  दिराजवळ नगर पेठेमध्ये दाखल होतो.त्यावेळी पेठेतील व्यापारी व ग्रामस्थ दिवटी बुधली घेऊन पालखी सोहळा प्रकाशमय करतात.नंदी चौकातून पायरी मार्गाला लागून पालखी वीरभद्र हेगडी प्रधान गणेश मंदिर मार्गे महाद्वारातून गडावर प्रवेश करते. भंडार गृहामध्ये मूर्ती स्थापित केल्यानंतर खांदेकरी मानकरी मंडळींना देवाच्या शेतामध्ये पिकलेले मुठभर धान्य रोजमुरा (रोजगार) म्हणून दिले जाते व सोमवती पालखी सोहळ्याची सांगता होते.


 



गुरुपौर्णिमा (सोमवार,दि.२२ जुलै २०१३)

गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ शुद्ध पौर्णिमा,अध्यात्मिक्षेत्रातीललोकांसाठी हा महत भाग्याचा दिवस, श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग मंदिर म्हणजे अध्यात्मिक गुरूंचे मोठे विद्यापीठच म्हणून तर भगवानगिरी,लक्ष्मणबाबा सारख्या गुरुनीकडेपठारवर समाधी घेतली. गुरुपौर्णिमेदिवशी रात्री स्वयंभू लिंगाची षोडोःपचारे पूजा केली जाते त्यासोबतच लिंगावर श्रीखंडाची पूजा बांधली जाते. त्यानंतर देवाची सेज विविध पुष्पांनी सजविली जाते.तळीभंडारानंतर अन्नदानाचा कार्यक्र


 

रंगपंचमी

दरवर्षी मेघमल्हार प्रतिष्ठान, www.jejuri.in ( देवा तुझी सोन्याची जेजुरी ) संकेतस्थळ आणि पुजारी सेवक वर्गाच्या वतीने जेजुरगडावर उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येते. दुष्काळाचे सावट असल्याने कमीत कमी पाण्याचा वापर करून रंगपंचमी साजरी केली जाते.  त्यासाठी पर्यावरण पूरक नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला. पहाटे तोंडधुनीच्या पूजेला भूपाळी गाऊन स्नान घालण्यात आले आणि महापूजेनंतर आरतीच्या अगोदर मुख्य गर्भगृहांतील श्रीमार्तंड भैरव मूर्ती, स्वयंभूलिंग आणि उत्सवमूर्तींना रंग लावला जातो. त्यानंतर दर्शनासाठी आलेले भविकही रंग खेळण्याचा आनंद घेतात.

450;300;4348feff5b4faa58d98eaaf417a11eb799d1da57450;300;2829484349b53f6ebd02fc50fea35950a9b6d9dd450;300;db50ac110928cdf2d9dceb6fb68ba0d7a2cfeb45450;300;936f6f2e422d680c41784db8cae2ee37d7573080450;300;cf0ee775eb5e75335d249d5c6a24b5ae627bd67c450;300;1cf13c273a98e4517bb3c680c6715c41891e843a450;300;e857941ac80b3d5ff6de4d2642127f70917612b7450;300;f706568d415489d48a9c4609138e4717034fa32d450;300;057dd093f2dfd1bcfc859f097d6e6ce2c67457f8450;300;4b1c0e9655e15d8f107674442be47eb36dfa8379450;300;d9eb5050fa7f5bef72ee5bb57944e7f216a657e3450;300;780fb61fafb1d555fa3694aef84d2f88ad0b9b9d450;300;29bb4cb27907241a695e3e875f97e546dfefa71c450;300;7cee254cef95c82de3602314224cb310d2e55b83450;300;d98cf91d5742b4b9cca91425c4f7c411ad664bbc450;300;401c44a7382352e32b6470312111cccc15415f8c450;300;341f2a50785fab33c1a82fbce011234402b29e5c450;300;5cd1ab4b51856e5246e59e3b50772cfb2fd1a111450;300;1ce72cbb9268dd3f461a9bd6dcea254995ae0add450;300;1da67cb80f62a92e84893acc2001400cab33dd61450;300;6a00301ec8b0b6391fe1488de5745c01678a1adf450;300;0a8e1cc2f77028f8ec880dcb23e8519f77855a19450;300;0c2da30853a12e1bd4bccfbfdf19b2c16029f211450;300;eeaa3883168b29538cb09ad96603697c0591175a450;300;315b32d0a7e3a282cc8de1b24394ab54124b2e17450;300;9a8f587b8c32305f2bcbc7b7dd68548bda9b9a1a450;300;c28748a26e923402be5995b575e2fdf14a83aaab450;300;64bcf9de87e88ee2d041f4d15c5b1796d4d1d9d3450;300;4c05516a36b75692639275855085f7a067d63668450;300;4f57a4139d22502274bca76807aa22205b7c8a05450;300;8ba6d54d47b570ba0e354ad9c9cba6a344e0101b450;300;d2d9b7513b3082708abe2dc9b7441fc955b91210450;300;aa94e11e39118d18dbac3cb319ead518af623f6e450;300;7f9e46118e4f59d6473c23bbcd6303d25a128c04450;300;9dfff0efde500d0544f3e99413d0e44cd6175716450;300;9a64d99a1bbca1eb1ab294d31b5a4b962af504c5450;300;9d4029bc4c4cfb7afefb828da098816fb751c53c450;300;57ec9433b8e53ed9f990eb15aaf9dc9e4db4f40e450;300;1aac42087afbe155e8c831aee3e8b6c9d6d30d93450;300;9e76961bc8995324f8a90181dd764adb7e588f9f450;300;6be5f21226589bb93f8bc2809ddae8af4ab56ceb450;300;45c70f431f643adad7f3f8b978c5d8bd7a6002d7450;300;e5bd0d5cff3e6f9eba9b005b5b367c0859449474450;300;7785f8cf5d3ca5b71fb91c9a9e12dbc68d49aea7450;300;ccfdac0c6f0bd93ed6971e9d4c6bd045013b5ccc450;300;3117e90015d55ebd0f33ba2bd4b51074088f5365450;300;9714a74b46fa4e13f1568afe554514b8c45f84af450;300;363893e23093ec2ed78ad90c22fc09d18de9cab7450;300;0377d16ccf6297a8e9adf42087426128e549c3f7
Bookmark and Share